पालिकेला दिला अॅक्शन प्लॅन !
By Admin | Updated: June 19, 2014 00:23 IST2014-06-19T00:14:12+5:302014-06-19T00:23:45+5:30
जालना : नगरपालिकेतील विविध सोळा विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी पालिकेला अॅक्शन प्लॅन दिला.

पालिकेला दिला अॅक्शन प्लॅन !
जालना : नगरपालिकेतील विविध सोळा विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी पालिकेला अॅक्शन प्लॅन दिला. नॉनस्टॉप सात तास चाललेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत यासह अन्य विभागांमधील कामांमध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टिने काही कामांच्या पद्धतीत बदल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी नायक यांचे नगरपालिकेत आगमन झाले. सुरूवातीला पालिकेच्या प्रांगणात नायक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर १०.५० वाजेपासून जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले. यावेळी मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची उपस्थिती होती. प्रत्येक विभागप्रमुख आणि त्यांचे सहकारी याप्रमाणे सोळा विभागांची बैठक घेण्यात आली. दुपारी ३ वाजता अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ मिनिटांचा कालावधी जेवणासाठी देण्यात आला. या काळात जिल्हाधिकारी नायक यांनी नाश्ता घेतला. त्यानंतर पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले. सायंकाळी ५.३० वाजता बैठक संपली.
विशेष म्हणजे आज नगरपालिकेत जवळपास सर्व अधिकारी, कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित होते. पालिकेत बंद पडलेली बायोमॅट्रिक हजेरी यंत्रणा सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी नायक यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी कचरा डेपोचीही पाहणी केली. (पान दोनवर)
थकबाकीदारांची नावे जाहीर करणार
शहरात मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे ८७ ब्लॉकस् आहेत. थकीत रक्कमेनुसार थकबाकीदारांची यादी करून ती वर्तमानपत्रांमधून जाहीर करण्यात येणार आहे. थकबाकीदार कोणीही असो, त्यांची नावे जाहीर होतील. पालिकेच्या पथकांकडून जप्तीची कारवाईदेखील केली जाणार आहे. थकबाकीदारांची यादी जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरदेखील सर्वांना पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिक्रमणे कायमस्वरुपी हटविणार
शहरात १४३ ठिकाणी अतिक्रमणे आहेत. ती हटविण्यासाठी नगरपालिका, पोलिस, महसूल, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संयुक्त पथकाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत, याचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जाग तसेच इतर मालमत्तांवर त्या जागेच्या मालकीचा फलक लावण्यात येणार आहे.
सफाईचा नवा फंडा
शहरात पालिकेचे स्वच्छतेसाठी सहा झोन पाडण्यात आलेले आहेत. सफाई कामगारांची संख्या सुमारे अडीचशे आहे. या सर्व कामगारांनी आठवड्यातून एक दिवस किमान दोन झोनमधील संपूर्ण सफाई करावी, या कामाला मोहीम म्हणून न राबविता, हीच पद्धत नेहमीसाठी ठेवावी, विभागप्रमुखांनी या सर्व कामांवर नियंत्रण ठेवावे, कचरा जाळण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.
शहर करणार हागणदारीमुक्त
शहरात किती कुटुंबियांकडे शौचालये आहेत, याचे सवेक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात शौचालये नाहीत, तेथे सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्याचा विचार आहे. टप्प्याटप्प्याने शहर हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. पालिकेत सर्व विभागांचा मिळून एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे.
जायकवाडीतून ५४ एमएलडी पाणी
जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे पाणी नागरिकांना वेळेवर मिळावे, यासाठी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असून ते ‘एसएमएस’ द्वारे नागरिकांना कळविण्यात येणार आहे. जायकवाडीतून ५४ एमएलडी पाणी दररोज मिळावे, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेचे जलाशय शोधून त्यांचा मालकी हक्क निश्चित केला जाणार आहे. त्यासाठी नगरभूमापन विभागाचीही बैठक घेण्यात येईल.
घरपोच देणार जन्मप्रमाणपत्र
नगरपालिकेअंतर्गत २२ अंगणवाड्या आहेत. तेथील अंगणवाडी सेविकांमार्फत नवजात मुलामुलींचे जन्म प्रमाणपत्र यापुढे घरपोच देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जन्म प्रमाणपत्रांसह पालिकेशी संबंधित लोकांना आवश्यक त्या सूचना एसएमएसद्वारे करण्याची पद्धतही अवलंबविली जाणार आहे.