काम उरकून घरी जाणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे अपहरण; चार तास शोध घेऊन पोलिसांनी केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:29+5:302021-01-13T05:20:29+5:30
जालना : स्वयंपाकाचे काम करून नवीन मोंढा येथून घरी जात असताना दोघांनी एका ५० वर्षीय महिलेचे अपहरण केल्याची घटना ...

काम उरकून घरी जाणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे अपहरण; चार तास शोध घेऊन पोलिसांनी केली सुटका
जालना : स्वयंपाकाचे काम करून नवीन मोंढा येथून घरी जात असताना दोघांनी एका ५० वर्षीय महिलेचे अपहरण केल्याची घटना जालना तालुक्यातील लोंढेवाडी शिवारात शनिवारी रात्री घडली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन महिलेची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी महिला जालना शहरातील हिंदनगर येथे राहते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्वयंपाकाचे काम करून महिलाने वरकड रुग्णालयातून मेडिकल घेतले. तेथून घरी जात असताना एका कारमध्ये आलेल्या दोघांनी महिलेचे अपहरण केले. तासभर शहरात फिरवून महिलेला लोंढेवाडीच्या जंगलात नेले. अपहरण करते दारू पीत असतानाच महिलेने तेथून पळ काढला. त्यानंतर महिला रेल्वेपटरीच्या बाजूला असलेल्या एका झुडपात लपून बसली. महिलेने मांडवा येथील जावई प्रल्हाद चंद यांना रात्री दहा वाजेच्या सुमारास फोन करून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. मी एका रेल्वेपटरीजवळील ऊस व मोसंबीच्या शेताजवळ लपून बसले असून, ते माझा शोध घेत आहेत. मी कोठे आहे, मला माहिती नाही, असे म्हणून मोबाइल बंद झाला. प्रल्हाद चंद यांनी याची चंदनझिरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रेल्वेपटरी असलेल्या ठिकाणच्या बाजूला मोंसबी व उसाचे शेत कोठे आहे? याची माहिती काढली. पोलीस नातेवाइकांना घेऊन सारवाडी येथे पोहोचले. या ठिकाणी मोंसबी व उसाचे शेत नसल्याने ते जालन्याच्या दिशेने गेले. पोलिसांनी सारवाडी, रोहणवाडी, लोंढेवाडी या गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन, ५-५ जणांचा ग्रुप तयार केला. प्रत्येक ग्रुपमध्ये एक पोलीस कर्मचारी देऊन शोध मोहीम सुरू केली; परंतु तरीही महिला सापडली नाही. शेवटी रात्री दीड वाजेच्या सुमारास लोंढेवाडी शिवारातील एका आडरानामधील झुडपामध्ये महिला सापडली. त्यानंतर महिलेला पोलीस ठाण्यात आणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरणाचे कारण अस्पष्ट
सदरील महिला ही गरीब असून, ती नवीन मोंढा येथे स्वयंपाकाचे काम करते. महिलेचे अपहरण पैशांसाठी झाले की, वाईट हेतूने झाले याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्यामसुंदर कोठाळे, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोलीस हवालदार वाघमारे, अनिल काळे, अनिल चव्हाण, चालक परमेश्वर हिवाळे यांनी केले.