जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटिव्ह ८८ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:51+5:302021-01-14T04:25:51+5:30
जालना : जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून नियमित उपचार घेणाऱ्या ८८ एचआयव्हीबाधित गरोदर महिलांनी एप्रिल, २००९ ते नोव्हेंंबर, २०२० ...

जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटिव्ह ८८ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
जालना : जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून नियमित उपचार घेणाऱ्या ८८ एचआयव्हीबाधित गरोदर महिलांनी एप्रिल, २००९ ते नोव्हेंंबर, २०२० या कालावधीत एचआयव्ही निगेटिव्ह बालकांना जन्म दिला आहे. केवळ १२ महिलांच्या बालकांना प्रसूतीनंतर एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एचआयव्हीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. जनजागृतीनंतर एचआयव्हीबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विशेषत: गर्भवती मातांची एचआयव्ही तपासणीही केली जात आहे. एप्रिल, २०१० ते नोव्हेंबर, २०२० या कालावधीत एचआयव्हीबाधित १०० महिला आढळून आल्या होत्या. त्यानंतर, या महिलांना येथील एआरटी सेंटरमधून नियमित औषधोपचार करण्यात आले. त्यामुळे १०० पैकी ८८ एचआयव्हीबाधित महिलांची जन्मलेली बालके एचआयव्ही निगेटिव्ह आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे, १२ महिलांची बालके एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. संबंधितांवर नियमित उपचार केले जात आहेत.
गत वर्षभरात केवळ दोन महिला आढळल्या बाधित
गत वर्षभरात जिल्हा रूग्णालय, महिला रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये जवळपास २९ हजार गरोदर महिलांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यातील दोन महिलांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे समोर आले.
बाधित गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी...
एचआयव्ही तपासणीनंतर एखाद्या गरोदर महिलेला एचआयव्हीची बाधा झाली, तर त्यांनी नियमित एआरटी सेंटरमधून उपचार घ्यावेत, सकस आहार घ्यावा. बाळाला केवळ सहा महिने अंगावर पाजावे.
एचआयव्हीची बाधा होऊ नये, यासाठी घ्यावयाच्या दक्षतेची माहिती विविध उपक्रमांमधून जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात आली आहे. एचआयव्हीबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात घटले आहे. जे बाधित रुग्ण आहेत, त्यांच्यावर एआरटी सेंटरमधून उपचार केले जात आहेत.
- राजेश गायकवाड, कार्यक्रमाधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष
रुग्णालय तपासणीटक्केवारी
जिल्हा रुग्णालय ४४९९ १.४६%
महिला रुग्णालय ७४६८ २.३३%
बदनापूर ११५३ ०.१७%
भोकरदन ३७७२ ०.००%
घनसावंगी २६१४ ०.०९%
मंठा ११९२ ०.०९%
परतूर १८२० ०.००%
टेंभुर्णी ११४१ ०.००%
अंबड १३५२ ०.४४%