७८ वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:22 AM2020-02-17T00:22:17+5:302020-02-17T00:22:41+5:30

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या ७८ जणांविरूध्द महावितरणच्या जालना उपकार्यकारी अभियंत्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली

8 thieves 'shock' to action | ७८ वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’

७८ वीजचोरांना कारवाईचा ‘शॉक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या ७८ जणांविरूध्द महावितरणच्या जालना उपकार्यकारी अभियंत्यांच्या भरारी पथकाने कारवाई केली. जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात गत दहा महिन्यांत करण्यात आलेल्या या कारवाईत १२ लाख २५५५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विजेची चोरी होऊ नये, यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम राबविली जाते. शिवाय वीजचोरी होऊ नये म्हणून मीटरमध्ये बदल करून नवे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, या नवीन मीटरलाही छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्यांची कमी नाही. अशा वीज चोरांविरूध्द महावितरणचे भरारी पथक कारवाई करीत आहे. जालना येथील पथकाने गत दहा महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागात आणि इतर जिल्ह्यांतही कारवाई केली आहे. यात ७८ जणांविरूध्द केलेल्या कारवाईत तब्बल ४२ लाख २० हजार ११५ रूपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले. या कारवाईनंतर १२ लाख २ हजार ५५५ रूपयांचा दंड संबंधितांनी भरला.
या पथकाने एप्रिल २०१९ मध्ये दोन कारवाया केल्या होत्या. यात ३ लाख ६८ हजार ९९० रूपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले होते. पैकी दोन्ही वीज चोरांनी रक्कम भरली आहे. मे महिन्यात झालेल्या सहा कारवायांमध्ये ६ लाख २२ हजार २८७ रूपयांची वीजचोरी समोर आली होती.
पैकी तीन वीजचोरांनी ३ लाख १९ हजार ७६८ रूपयांची रक्कम जमा केली आहे. जूनमध्ये केलेल्या ९ कारवायांमध्ये ४ लाख ६२ हजार ५३२ रूपयांची वीजचोरी समोर आली होती. यातील एकाही वीजचोराने रक्कम भरलेली नाही. जुलैमध्ये झालेल्या तीन कारवायांमध्ये १ लाख ४८ हजार ४० रूपयांची वीजचोरी पकडण्यात आली होती. यातील केवळ एकाने १ लाख ८ हजार ८६० रूपयांचा भरणा केला आहे. आॅगस्ट महिन्यात झालेल्या पाच कारवायांमध्ये २ लाख ४० हजार ७२० रूपयांची वीजचोरी आढळून आली होती. सप्टेंबरमध्ये ६ कारवायांमध्ये २ लाख ३४ हजार ६५५ रूपयांची, आॅक्टोंबरमध्ये ८ कारवायांमध्ये ३ लाख ८१ हजार ७३० रूपयांची वीजचोरी समोर आली होती. या तिन्ही महिन्यांत झालेल्या कारवायांमधील वीजचोरांनी रक्कम भरलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात या पथकाने तब्बल १६ ठिकाणी कारवाया करून ८ लाख ३६ हजार ८४९ रूपयांची वीजचोरी समोर आणली होती. यातील ४ जणांनी २ लाख ४६ हजार ७० रुपयांचा भरणा केला आहे. डिसेंबर महिन्यात ११ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यातून ३ लाख ९१ हजार ५३२ रुपयांची वीजचोरी समोर आली. तर केवळ दोघांनी १ लाख ५८ हजार ८४९ रूपयांचा भरणा केला आहे. जानेवारी २०२० मध्ये १२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, ५ लाख ३२ हजार ६८० रूपयांची वीजचोरी पकडण्यात आली. यातील एकाही वीजचोराने रक्कम भरलेली नाही.
पोलीस ठाण्यात तक्रारी : तब्बल ६२ गुन्हे अद्यापही प्रलंबित
भरारी पथकाने कारवाई करून वीजचोरी पकडल्यानंतर संबंधितांना रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ज्यांनी रक्कम भरली नाही, अशांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जातो. या पथकाने जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे दिलेल्या तक्रारींपैकी तब्बल ६२ गुन्हे दाखल झालेले नाहीत. पोलीस प्रशासनाने हे गुन्हे दाखल केले नसल्याने पुढील कायदेशीर प्रक्रियाही थंडावली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
शहरात आकड्यावर आकडे
जालना शहरातील काही भागात दिवसरात्र विजेची चोरी केली जात आहे. भरारी पथक मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणा-यांवर कारवाई करीत आहे. मात्र, लाईनमनसह इतर कर्मचारी आकडे टाकून होणा-या वीजचोरीकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाढलेली वीजचोरी पाहता महावितरणने वीज चोरांविरूध्द कारवाई मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.
अनामत भरूनही वीजमीटर मिळेना
वीज मीटर मिळावे म्हणून अनेकांनी वीजवितरण कंपनीकडे डिमांड भरले आहेत. परंतु वीज मीटर नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजवितरणच्या अधिका-यांनी अनामत रक्कम भरणा-यांना मीटर द्यावेत आणि नंतरच कारवाई करावी अशी मागणी अनामत रक्कम भरणा-या ग्राहकांकडून होत आहे.

Web Title: 8 thieves 'shock' to action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.