चोरीस गेलेल्या ७३ मोबाइलचा सायबर पोलिसांनी घेतला शोध
By दिपक ढोले | Updated: August 22, 2023 20:44 IST2023-08-22T20:43:57+5:302023-08-22T20:44:22+5:30
मिळालेल्या मोबाइलमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद, सायबर पोलिसांनी सदरील तक्रारींची नोंद संचारसाथी पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक पध्दतीने मोबाइलचा शोध घेतला.

चोरीस गेलेल्या ७३ मोबाइलचा सायबर पोलिसांनी घेतला शोध
जालना : चोरीस गेलेल्या १३ लाख ६८ हजार १२७ रुपये किमतीच्या ७३ मोबाइलचा पोलिसांनी संचारसाथी पोर्टलच्या साहाय्याने शोध घेऊन नागरिकांना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते मंगळवारी परत केले आहे. ही कारवाई सायबर पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून मोबाइल चोरीला गेले होते. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
सायबर पोलिसांनी सदरील तक्रारींची नोंद संचारसाथी पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक पध्दतीने मोबाइलचा शोध घेतला. पोलिसांनी जवळपास १३ लाख ६८ हजार १२७ रुपये किमतीचे ७३ मोबाइल गेल्या तीन महिन्यांत शोधून काढले आहेत. त्यापैकी २९ मोबाइल यापूर्वी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते परत करण्यात आले. चोरीस गेलेले मोबाइल परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. वडते, पोउपनि. देशमुख, सफौ. पाटोळे, पोह.राठोड, पोना. मांटे, पोशि. भवर, गुसिंगे, पोश, मुरकुटे, मपोह पालवे, नागरे, दुनगहू यांनी केली आहे.
मोबाइल चोरी झाल्यास तत्काळ माहिती द्या
जर एखाद्या व्यक्तीचा मोबाइल चोरी झाल्यास त्याने तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. आधार कार्ड व पोलिस ठाण्याची फिर्याद घेऊन सायबर पोलिस ठाण्यात द्यावे. त्याची नोंद संचारसाथी पोर्टलवर केली जाईल. - तुषार दोशी, पोलिस अधीक्षक