जिल्हा स्त्री रुग्णालयात वर्षभरात ६६२६ प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:35+5:302021-02-24T04:32:35+5:30
जालना : गत वर्षभरात जिल्हा स्त्री रुग्णालयात तब्बल ६६२६ महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असून, ...

जिल्हा स्त्री रुग्णालयात वर्षभरात ६६२६ प्रसूती
जालना : गत वर्षभरात जिल्हा स्त्री रुग्णालयात तब्बल ६६२६ महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असून, १०२४ प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाल्या आहेत. इतर प्रसूती या नैसर्गिक पद्धतीने झाल्या आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालयाचे स्वतंत्र कामकाज सुरू झाल्यापासून येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलाही या रुग्णालयात प्रसूतीसाठी येतात. दैनंदिन सरासरी १५ ते २० दरम्यान प्रसूती या रुग्णालयात होतात. प्रसूतीपूर्वी नियमित उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरोदर मातांची संख्याही मोठी आहे. अधिकारी, कर्मचारी संख्या कमी असली तरी येथे उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांना आहार, औषधे, व्यायाम आदींबाबत सल्ले दिले जातात. प्रसूतीसाठी आल्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथील परिचारिका प्रसूतीचे काम करतात. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सल्ला आणि महिलांकडून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले जाणारे औषधोपचार यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण येथील रुग्णालयात कमी असल्याचे दिसून येत आहे. परंतु, सिझेरियनचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे चित्र आहे. गत वर्षभरात या रुग्णालयामध्ये झालेल्या प्रसूतींपैकी १०२४ महिलांचे सिझेरियन झाले आहे. विशेषत: मागील वर्ष हे पूर्णत: कोरोनात गेले आहे. कोरोनामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसह बालकांची आवश्यक ती काळजी घेऊन प्रसूती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रसूतीनंतर बाळाला कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही कमीच असल्याचे दिसते.
केवळ एका महिलेचा मृत्यू
गत वर्षभरात कोरोनाचा फैलाव असताना जिल्हा स्त्री रुग्णालयात मोठ्या प्रमाणात प्रसूती झाल्या आहेत. या कालावधीत ऑगस्ट महिन्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सिझेरियन प्रसूतीपेक्षा नैसर्गिक प्रसूती होण्याचे प्रमाण या रुग्णालयात अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
येथील रुग्णालयात प्रसूतीसाठी जिल्हाभरातून महिला येतात. रुग्णालयात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याने नैसर्गिक पद्धतीने अधिक प्रसूती होतात. सिझेरियनचे प्रमाण कमी करण्यासाठीही प्रयत्न असून, महिलांनीही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. आर. एच. पाटील, अधीक्षक
गरोदरपणात अधिक काळजी घेणे गरजेचे
महिलांनी गरोदरपणात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तपासणीच्या वेळी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घेणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रसूतीदरम्यान अधिकचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
२०२० मध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या महिला
सीझर १०२४
नॉर्मल ५६०१
माता मृत्यू १
कुठल्या महिन्यात किती?