६५१ चालक- वाहकांचा रोज ४५ हजार प्रवाशांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:49+5:302021-02-26T04:43:49+5:30
जालना : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खबरदारी घेतली जात आहे. परंतु, दररोज ...

६५१ चालक- वाहकांचा रोज ४५ हजार प्रवाशांशी संपर्क
जालना : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खबरदारी घेतली जात आहे. परंतु, दररोज ४५ हजार प्रवाशांशी संपर्क येणाऱ्या ६५१ चालक व वाहकांची ना तपासणी करण्यात आली, ना त्यांच्या लसीकरणाचा विचार केला जात आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जालना जिल्ह्यात चार आगार आहेत. यात परतूर, जालना, अंबड, जाफराबाद या आगारांचा समावेश होतो. या चारही आगारातून दररोज २५० बसेस धावतात. ६५१ चालक व वाहक दररोज ४५ हजार प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे त्यांचा दररोज प्रवाशांची संपर्क येतो. असे असताना वाहक व चालकांची एस. टी. महामंडळाकडून कोरोना तपासणी करण्यात आली नाही. मास्क घातल्याशिवाय प्रवेश नसल्याची सूचना प्रत्येक बसवर लिहिण्यात आली आहे. परंतु, वाहक व चालकच मास्कशिवाय कर्तव्य बजावत असून, सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे.
एस. टी.चे चालक - वाहक दररोज ४५ हजार प्रवाशांची ने-आण करतात. असे असताना त्यांचे लसीकरण तातडीने करण्याची गरज होती. परंतु, प्रशासनाकडून अद्याप लसीकरणाचे नियोजन करण्यात आले नाही. या चालक व वाहकांना महामंडळातर्फे मास्क देण्यात येतात, असा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, चालक व वाहकांना मास्क देण्यात आले नाहीत. मास्क व सॅनिटायझर न दिल्याने वाहक व चालकांना स्वत: खर्च करून मास्क व सॅनिटायझर खरेदी करावे लागत आहेत. आधीच कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनने वाहक व चालकांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे सर्वजण अडचणीत आहेत. त्यातच आता मास्क व सॅनिटायझरचा खर्च वाढला आहे. वाहक व चालक विनामास्क असल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
४५००० प्रवाशांचा रोज प्रवास
जालना जिल्ह्यात चार आगार आहेत. यात परतूर, जालना, अंबड, जाफराबाद यांचा समावेश होतो. या चारही आगारांमधून दररोज २५० ते ३०० बसेस ये-जा करतात. या बसेसमधून जवळपास ४५ हजार प्रवासी प्रवास करतात, अशी माहिती एस. टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.
तपासणीच नाही
प्रशासनाकडून दररोज नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. परंतु, दररोज हजारो प्रवाशांशी संपर्क येणाऱ्या चालक व वाहकांची अद्याप कोविड चाचणी करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत एखादा वाहक वा चालक पॉझिटिव्ह असेल तर त्यामुळे किती जणांना कोरोनाची लागण होऊ शकते, याचा विचार करण्याची गरज आहे.
लसीकरण कधी
शासनाकडून डॉक्टर, पोलीस, शासकीय कर्मचारी यांना लसीकरण केले जात आहे. मात्र, हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या चालक व वाहकांच्या लसीकरणाचा साधा विचारही करण्यात आला नाही. अद्याप तशा सूचना प्राप्त न झाल्याने लसीकरण कधी केले जाईल, हे माहीत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मास्कसाठी स्वत:च खर्च करावा लागतोय
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनने वाहक - चालकांचा पगारही वेळेवर झाला नव्हता. त्यामुळे उसनवारी करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. त्यातच आता मास्क व सॅनिटायझरही त्यांना स्वत: खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत एस. टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही चालक व वाहकांना मास्क खरेदी करून देत आहोत. परंतु, प्रत्यक्षात त्यांना मास्क मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
जालना जिल्ह्यात ६५१ चालक व वाहक आहेत. त्यांना एस. टी. महामंडळातर्फे मास्क दिले जात आहेत. त्यांच्या कोरोना तपासणीचे आदेश अद्याप आले नाहीत. आदेश येताच त्यांची तपासणी केली जाईल. तसेच लसीकरणाचेही नियोजन करण्यात आले नाही. तरीही आम्ही त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे एस. टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.