६० उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:50+5:302021-01-02T04:25:50+5:30
अंबड : येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये ६० उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यात ...

६० उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर
अंबड : येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये ६० उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यात ४५ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अर्ज अवैध ठरवले असल्याचे सांगण्यात आले. तर आपल्याला अशा प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केले नव्हते, तर २ हजार १५ उमेदवारांनी अर्जाचे शुल्क भरले होते. त्यापैकी १ हजार ९५३ अर्ज वैध ठरविण्यात आलेले असून, ६० अर्ज अवैध ठरविण्यात आलेले आहेत. यात निवडणूक आयोगाकडे मागील पंचवार्षिक खर्च सादर न करणे, वयाची पात्रता पूर्ण न करणे आदींसह विविध अटी शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे अर्ज बाद झाले असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी महसूल प्रशासनाच्या वतीने झाली असून, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची गुरुवारी शेवटच्या दिवशी २ हजार १३ पैकी ६० नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. तर वैध उमेदवार १ हजार ९५३ राहिले. गुरुवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी एकूण तीन फेऱ्यांमध्ये झाली. पहिल्या फेरीत २४ गावे, दुसऱ्या फेरीत २४ व तिसऱ्या फेरीत २३ गावे होती. दरम्यान २ हजार १३ उमेदवारी अर्जांपैकी १ हजार ९५३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत, तर ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. याकामी २४ निवडणूक निर्णय अधिकारी व २४ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत.
छाननीअंती शहापूर येथील सात जणांचे अर्ज अवैध ठरले, तर वाळकेश्वर पाच, गोरी गांधारी, राहुवाडी, पांगरी, भालगाव प्रत्येकी तीन, पाथरवाला, कुरण, कोठाळा, कर्जत, सुखापुरी, दहेगाव, आलमगाव येथील प्रत्येकी दोन, चुर्मापुरी, डावरगाव, शहागड, वलखेडा, दहिपुरी, रामनगर, कवडगाव, बनटाकळी, डावरगाव, वलखेडा, ताड हादगाव, गोविंदपूर, रोहिलागड, पारनेर आणि गोंदी येथील प्रत्येकी एक उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. एकूण तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या या छाननी प्रक्रियेत वाद- विवाद झाल्यामुळे बऱ्याच वेळा खोळंबा झाला होता.
तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी आक्षेप नोंदवून हरकत घेतल्या. या प्रक्रियेत तहसीलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार बाबूराव चंडोल, अंजली कुलकर्णी, अनिता मोरे, भागवत देशमुख यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले होते.
तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत ६२७ सदस्य निवडण्यासाठी अनुसूचित जाती ७७, अनुसूचित जमाती ०७, इतर मागास प्रवर्ग १६३, सर्वसाधारण ३८० अशा प्रकारे विविध संवर्गांतून एकूण ६२७ उमेदवार २३४ प्रभागांतून निवडले जाणार आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी एकूण १ लाख १५ हजार ९२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ६० हजार २४२ पुरुष असून, ५५ हजार ६८५ स्त्रिया मतदारांचा समावेश आहे. शिवाय २५८ मतदान अधिकाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना ३ जानेवारीपासून तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.