तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणुकीतून ५७ जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:18+5:302021-01-08T05:39:18+5:30
तीर्थपुरी : तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीयांनी एकत्रित निर्णय घेत भरलेल्या ...

तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणुकीतून ५७ जणांची माघार
तीर्थपुरी : तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीयांनी एकत्रित निर्णय घेत भरलेल्या १७ पैकी १६ जागांसाठी भरलेले ५७ उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. तर केवळ एका जागेसाठी मतदानप्रक्रिया होणार आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या तीर्थपुरी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होणार असल्याची पहिली उद्घोषणा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २३ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. त्याची ३० दिवसांची मुदत २१ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यातच तीर्थपुरी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यात यावी, असे पत्र नगरविकास खात्याने राज्य निवडणूक आयोगालाही दोन्ही वेळेस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाकडून कोणत्या प्रकारची सूचना न आल्याने निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. त्यामुळे तीर्थपुरी या ठिकाणी दोनवेळा निवडणूक घेणे हे जनतेच्या हिताचे नाही, असा विचार करून गावातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी व ग्रामस्थांनी बैठक घेतली. बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी १७ जागांसाठी भरलेल्या १६ जागांवरील ५७ नामनिर्देशनपत्र परत घेण्यात आले. सर्वपक्षीयांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेऊन नगरपंचायतीसाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. केवळ वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एका जागेसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, शिवाजी बोबडे, सरपंच शैलेंद्र पवार, अंकुश बोबडे, तात्यासाहेब चिमणे, गणेश पवार, नारायण बोबडे, रामप्रसाद बोबडे, मेहेरनाथ बोबडे, श्रीकष्ण बोबडे, रमेश बोबडे, कल्याण चिमणे, सचिन चिमने, विजय चिमने, श्रीराम गिरी, सुदाम मापारे, काकासाहेब कासार आदींनी प्रयत्न केले.
गावाच्या विकासासाठी निर्णय
तीर्थपुरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे. गावाचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर तीर्थपुरी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि दोन वेळेसच्या निवडणूक प्रक्रियेत ग्रामस्थांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी सर्वपक्षीयांनी हा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीयांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे.