शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त; तक्रारी सोडविताना अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:15+5:302021-07-14T04:35:15+5:30
जालना : एकीकडे कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे शिक्षण विभागातील पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून, ...

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त; तक्रारी सोडविताना अडचणी
जालना : एकीकडे कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे शिक्षण विभागातील पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असून, अनेक शिक्षक, पालकांच्या तक्रारींचा निपटाराही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, अधीक्षक यासह इतर विविध पदे शासनाने निर्माण केली आहेत. परंतु, जालना जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मंजूर आठ पैकी सहा पदे रिक्त आहेत. हा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांचेही एक पद रिक्त आहे. शिवाय जिल्ह्यातील शालेय पोषण आहार अधीक्षकांची चार पदे रिक्त आहेत.
तक्रारी सोडवायच्या कोणी?
शाळा सुरू असतानाच अनेक कामचुकार शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांसह गावा-गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. कायम अधिकाऱ्यांकडून या तक्रारीनुसार वेळेवर कार्यवाही केली जाते.
शिक्षकांसह शिक्षक संघटनांचेही एक ना अनेक प्रश्न असतात. वेळोवेळी निवेदने, बैठका घेऊन प्रसंगी आंदोलन करून हे प्रश्न मांडले जातात. परंतु, रिक्त पदांमुळे शिक्षकांच्या तक्रारी वेळेत सुटत नाहीत.
रिक्तपदांमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होतो. कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे.
पालक म्हणतात, तक्रार करायची कोठे ?
अनेकवेळा शाळेतील फीसह शिक्षकांच्या असोत किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असोत त्या अनेक पालक करतात. परंतु, प्रभारी अधिकारी असल्यामुळे त्या तक्रारीनुसार संबंधितांवर कारवाई वेळेवर होत नाही.
- बाळासाहेब लटपटे
शाळा, शिक्षक, शालेय पोषण आहार, शालेय फीस यासह इतर अनेक प्रश्न आहेत. या तक्रारी मांडताना प्रभारी अधिकारी असल्याने अडचणी होतात. त्यामुळे शिक्षण विभागामध्ये कायम अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.
- कल्याण गवळी
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहेत. शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची पदेही रिक्त आहेत. रिक्तपदे असल्याने कार्यालयातील कामे प्रलंबित राहत आहेत.
- संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक कर्मचारी संघटना
जिल्हा शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे कामकाजात एक ना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षकांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत नाहीत. याचा त्रास शिक्षकांना सहन करावा लागत असून, रिक्तपदे भरावीत.
- राजकुमार दावणगावकर,जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब शिक्षक संघटना