उभ्या ट्रकमधून कपड्यांचे ४८ गठ्ठे चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:06+5:302021-01-08T05:42:06+5:30
बदनापूर : उभा असलेल्या ट्रकमधून कपड्यांचे ४८ गठ्ठे लंपास केल्याची घटना जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर तालुक्यातील वरुडी फाटा येथे ...

उभ्या ट्रकमधून कपड्यांचे ४८ गठ्ठे चोरीस
बदनापूर : उभा असलेल्या ट्रकमधून कपड्यांचे ४८ गठ्ठे लंपास केल्याची घटना जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर तालुक्यातील वरुडी फाटा येथे मंगळवारी पहाटे घडली. चोरट्यांनी तब्बल ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
शेख अमीर शेख हमीद हे अहमदाबाद येथून ट्रकने (एमएच- २० डीई- २६३०) कच्च्या व रेडिमेड कपड्यांचे गठ्ठे घेऊन निजामाबाकडे जात होते. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरुडी फाट्यावर त्यांनी ट्रक उभा केला. सय्यद अमीर हे केबिनमध्ये झोपलेले असताना चोरट्यांनी पाठीमागून ताडपत्री व रस्सी कापून उभ्या ट्रकमधील ४८ गट्टे चोरून नेले. सकाळी सात वाजेच्या सुमारास शेख अमीर शेख हमीद यांना जाग आली, तेव्हा कपड्यांचे गट्टे चोरी गेल्याचे कळाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शेख अमीर शेख हमीद (२३, देवगाव, ता. बदनापूर) यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.