४ हजार शालेय विद्यार्थ्यांचा बसने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:51+5:302021-01-03T04:30:51+5:30
विकास व्होरकटे जालना : विद्यार्थ्यांमधून होणारी मागणी पाहता जिल्ह्यामधील विविध प्रमुख मार्गांवर ५५ राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू करण्यात ...

४ हजार शालेय विद्यार्थ्यांचा बसने प्रवास
विकास व्होरकटे
जालना : विद्यार्थ्यांमधून होणारी मागणी पाहता जिल्ह्यामधील विविध प्रमुख मार्गांवर ५५ राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्य:स्थितीत ४ हजार विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाच्या बसचा पास काढून घेतला आहे.
ग्रामीण भागामध्ये आजही प्रवासाच्या भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे शाळकरी मुले खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी ये- जा करण्यासाठी बसचाच उपयोग करतात. कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या वर्गांपैकी दहावी ते बारावीदरम्यानचे वर्ग सध्या सुरू झालेले आहेत; परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे शहरात शिक्षणासाठी जाण्यासाठी स्वत:चे वाहन नसल्याने विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाकडे बस सुरू करण्याची मागणी मध्यंतरी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी व संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्या वतीने मानव विकासच्या बसह इतर काही अशा एकूण ५५ बस पाथ्रुड, सायगाव, डोंगरगाव, ओजमपुरी, सेवली आदी गावांच्या प्रमुख मार्गावर २ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. या बस दिवसाकाठी जवळपास २५० फेऱ्या पूर्ण करीत आहेत. आजवर अहिल्याबाई होळकर, मानव विकास आणि विद्यार्थी पास अशा एकूण चार हजार पासेसची विक्री बसस्थानकांमधून झाली आहे. यात आठवी ते बारावीदरम्यानच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अंबड आगारातून १६ बस सोडण्यात आल्या आहेत. यापाठोपाठ जालना आगार- १४, जाफराबाद- १३, तर परतूर आगारातून १२ बस सोडण्यात आल्या आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांची मागणी पाहून शालेय बस वाढवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
चौकट
जे विद्यार्थी दररोज आपल्या गावातून इतर गावात शिक्षणासाठी अप- डाऊन करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने सवलतीच्या दरात पास दिल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी इतर गावात ये- जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार बसचा पास काढून शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून करण्यात आले आहे.
आगारनिहाय बस
अंबड - १६
जालना - १४
जाफराबाद - १३
परतूर - १२