३० हजारांची लाच घेतांना PSI जाळ्यात; तक्रारदाराला करत होता मदत
By दिपक ढोले | Updated: August 23, 2023 20:58 IST2023-08-23T20:57:58+5:302023-08-23T20:58:02+5:30
तडजोड करून ३० हजारांची लाच स्वीकारताना योगेश चव्हाण यांना पकडण्यात आले.

३० हजारांची लाच घेतांना PSI जाळ्यात; तक्रारदाराला करत होता मदत
जालना : अर्जाच्या चौकशीमध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना अंबड पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ताब्यात घेतले. योगेश हरी चव्हाण (३९) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदाराने गट क्रमांक ७१८ क्षेत्रातील ५ एकर २९ गुंठ्याचा व्यवहार संतोष हरणे यांच्याशी केला होता. त्यात वाद विवाद होऊन संतोष हरणे यांनी अंबड येथे तक्रारदाराविरोधात अर्ज दिला.
त्या अर्जाच्या चौकशीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने मदत करून देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी प्रथम तक्रारदाराच्या मित्रामार्फत दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. आणखी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. तडजोड करून ३० हजारांची लाच स्वीकारताना योगेश चव्हाण यांना पकडण्यात आले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल फुला यांच्यासह शिरीष वाघ, राजेंद्र सिनकर, चांगदेव बागुल यांनी केली आहे.