सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास पहारा
By Admin | Updated: July 2, 2014 00:26 IST2014-07-01T23:23:34+5:302014-07-02T00:26:58+5:30
केवल चौधरी , जालना शहरातील २० चौकांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवून संरक्षणाच्या दृष्टीने त्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे २४ तास पहारा
केवल चौधरी , जालना
शहरातील २० चौकांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवून संरक्षणाच्या दृष्टीने त्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी याबाबत नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांना सूचना केली होती. सी.सी.टी.व्ही. बसविण्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती राहणार आहे. या समितीच्या सुचनेनुसार सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविले जातील. पालिका सर्व खर्च करणार असली तरी नियंत्रण पोलिसांकडे राहील. हायटेक सीटी निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग राहणार आहे. रस्ते, एल.ई.डी. पथदिवे आणि आता सी.सी. टी.व्ही. यामुळे शहराला वेगळेपण येणार आहे.
पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानक, बस स्थानक, गांधी चमन, मोतीबाग, सिंधीबाजार, शिवाजी पुतळा, बाबूराव काळे चौक, गुरूबचन चौक, जिजामाता कमान, घनतृप हनुमान चौक, टांगा स्टॅण्ड, सराफा मार्केट, मंमादेवी चौक, शनी मंदिर जुना जालना, बडीसडक राम मंदिर, मुर्गी तलाब, दुर्गा माता/झाशी राणी पुतळा, महावीर चौक, सुभाष चौक, भोकरदन नाका, कन्हैय्यानगर, मंठा नाका, दत्त आश्रम आदी चौकांची निवड करण्यात आली आहे. तूर्तास २० पर्यंत चौकात ही यंत्रणा बसविली जाणार असली २५ चा टप्पा गाठण्याचा समितीचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी वाय-फाय यंत्रणा असणार असल्याने कोठेही वायर दिसणार नाही. चौकात बसविल्यानंतर संपूर्ण चौक संरक्षित होऊ शकले, एवढी खांबाची उंची राहील. वॉटर प्रुफ कॅमेरे १.३ मेगा फिक्सल शक्तीचे राहतील. तसेच आय.सी. म्हणजे इंटरॉक्ट प्रोटोकॉल स्टीमचे कॅमेरे आहेत. त्याचे नियंत्रण पोलिस अधीक्षक, सदर बाजार, कदीम जालना, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि दहा जणांच्या समिती सदस्यांच्या मोबाईलवर इंटरनेटद्वारे जोडले जातील.
पद्मा भरतिया यांनी सांगितले, प्रस्ताव आल्यानंतर आपण मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देण्यासाठी चर्चा केल्यानंतर त्यांनी यासाठी अनुदानही मिळवून देण्याचे सांगितले. त्यामुळे सर्व काही जुळून आले. त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. हा ठराव नगर पालिकेच्या सभेत मांडून आठवडाभरात निर्णय होणार आहे. एल.ई.डी. पथदिव्यांनी शहर उजळून निघत आहे. चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचा लाभ होत असला तरी २४ तास नजर ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
पोलिसांना होणार मदत
ज्योतीप्रिया सिंह यांनी सांगितले, वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांशिवाय काही खबऱ्यांची मदत घेतली जाते. रात्रीचे गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा तोकडी पडते. त्यासाठी नगराध्यक्षा पद्मा भरतिया आणि जिल्हाधिकारी नायक यांना आपण ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. पोलिस यंत्रणेला मोठी मदत मिळणार असून २४ तास शहरावर नजर राहील. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर लक्ष राहील.