जालना : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, जवळपास ८५२.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, याची टक्केवारी ही १४१ एवढी होत आहे. हा पाऊस सर्वात जास्त अंबड आणि घनसावंगीत पडला. यामुळे जिल्ह्यातील जवळपास २१५ कच्ची घरे पडली असल्याचे सांगण्यात आले. तर, अंदाजे जवळपास १८ हजार ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
मध्यंतरी पाऊस रूसल्याने खरिपाची पिके घोक्यात येण्याची भीती व्यक्त होत होती. असे असतानाच १५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पंधरा दिवसात जवळपास २०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला. या जोरदार पावसाने जिल्ह्याची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने परतूर तालुक्यातील बामणी गावातील रहिवासी आसाराम बाबूराव खालापुरे वय ५० हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या जोरदार पावसाचा सर्वात मोठा फटका अंबड आणि घनसावंगी तालुक्याला बसला. या दोन तालुक्यांमध्ये २२२ कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, १३८ मोठी जनावारे वाहून गेली. त्यात गाय, म्हैस, बैल, बकऱ्यांचा समावेश आहे. नजर पंचनाम्यानुसार एकट्या अंबड तालुक्यात जवळपास साडेचार हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, घनसावंगी तालुक्यातही तीन हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहेत. परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरातही जोरदार पावसाने आजही अनेकांच्या शेतात मोठे पाणी साचले आहे.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या
प्रकल्पांमध्ये ६७ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा असून, जवळपास ५७ लघु तलावांमध्ये ६८ टक्के पाणी साठले आहे. अंबड तालुक्यातील गल्हाटी हा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, जिल्ह्यातील २६ लघु तलावही शंभर टक्के भरले असून, अन्य तलावांमध्ये देखील ८० टक्के पाणीसाठा साचला आहे. जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के, कल्याण गिरीजा शंभर टक्के, बदनापूर तालुक्यातील अपर दुधनामध्ये २८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ५४ .७३ टक्के, धामना ४३ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्प अद्यापही कोरडा असून, तेथे केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघु प्रकल्प असून, त्यात मंगळवार पर्यंत ६७ .६५ टक्के पाणी साठले आहे. यातील सहा लघु तलावांमध्ये दमदार पावसानंतरही ते प्रकल्प जोत्याच्या पाणी पातळीखाली असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.