२०० महिलांचा कुटुंब नियोजनात पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:15+5:302021-01-08T05:42:15+5:30
जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे ...

२०० महिलांचा कुटुंब नियोजनात पुढाकार
जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी पुरूषांनी मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे कानाडोळा केला आहे. गत महिन्यापासून जिल्ह्यात २०० महिलांनी शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येतो. ज्या महिला व पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतात. त्यांना शासनातर्फे मदतदेखील केली जाते. सर्वसामान्य महिलेला २५० रूपये तर अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील महिलांना ६५० रूपये दिले जातात. पुरूषांनी नियोजन शस्त्रक्रिया केली तर १०० रूपये दिले जातात.
मागील दहा ते अकरा महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवरही परिणाम झाला. मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. लॉकडाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने मागील महिन्यापासून पुन्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. आतापर्यंत २०० महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
हसनाबाद आरोग्य केंद्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील आरोग्य केंद्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या केंद्रात ५१ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर रेणुकाई पिंपळगाव ३८, दहिफळ खंदारे २५, ढोकसाळ ३२, वाटूर १२, खासगाव १७, तर शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद होत्या. मागील महिन्यापासून शस्त्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात २०० महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. एकाही पुरूषाने शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला नाही. महिलांसह पुरूषांनीही शस्त्रक्रिया करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.