विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST2021-01-02T04:26:15+5:302021-01-02T04:26:15+5:30
हिवरा रोषणगाव येथील घटना ; विद्युुत मोटार सुरू करताना बसला धक्का जालना : शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या ...

विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
हिवरा रोषणगाव येथील घटना ; विद्युुत मोटार सुरू करताना बसला धक्का
जालना : शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील हिवरा रोषणगाव येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. ज्ञानेश्वर बाबासाहेब पाचारे (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे.
बाबासाहेब पाचारे यांची हिवरा रोषणगाव शिवारात साडेतीन एकर शेती आहे. त्यांना चार मुले असून ज्ञानेश्वर हा सर्वात लहान होता. सध्या त्यांच्या शेतातील हरभरा पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. परंतु, कधी रात्री तर कधी दिवसा वीज येत असल्याने सर्व मुले आळीपाळीने पिकांना पाणी देत होते. दोन दिवसांपासून रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने ज्ञानेश्वर हा नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेतात गेला होता. मात्र, विद्युत पंप सुरू करताना त्याला अचानक विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. मध्यरात्री मोठा भाऊ शिवम पाचारे याने ज्ञानेश्वरला फोन केला असता, त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शिवमला शंका आली. त्याने पहाटेच शेताकडे धाव घेतली. तेथे त्याला ज्ञानेश्वर मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीड महिन्यांत पाच जणांचा मृत्यू
यंदा जोरदार पाऊस झाल्याने रबीची पिके जोमात आली आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी पाणी देत आहेत. परंतु, महावितरणकडून रात्री वीजपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांना रात्री शेतात जावून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. १८ नोव्हेंबर रोजी शेतातील विद्युत पंप सुरू करताना अचानक विद्युत धक्का लागल्याने विहिरीत पडून तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे घडली होती. या घटनेनंतर लगेचच बदनापूर येथेही विद्युत धक्का लागून एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी हिवरा रोषणगावात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विद्युत धक्का लागून दीड महिन्यांत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.