आधार लिंक नसल्याने १६०० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:44+5:302021-01-15T04:25:44+5:30
गोरगरिबांच्या पाल्यांच्या शिक्षणात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी शासनातर्फे विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. या ...

आधार लिंक नसल्याने १६०० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
गोरगरिबांच्या पाल्यांच्या शिक्षणात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी शासनातर्फे विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. या अंतर्गत जेवण, राहणे, क्लासेस व कॉलेजचा खर्च दिला जातो. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, फ्रिशीप योजना, छत्रपती शाहू महाराज मेरीट शिष्यवृत्ती योजना आदी योजनांच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती महाविद्यालयाकडे वर्ग केली जाते. दोन टप्प्यात ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दरवर्षी आॅनलाईन अर्ज मागविले जातात. काही वर्षांपासून शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही जालना जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आधार लिंक केले नाही. समाजकल्याण विभागाकडे २०१९-२० या वर्षात विविध योजनांसाठी १२०२३ जणांचे अर्ज आले होते. त्यापैकी १००१४ अर्जांना मंजुरी देण्यात आली. ९२३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर तब्बल १६०० विद्यार्थ्यांना आधार लिंक केले नसल्याने ते शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे.
महाविद्यालयांचे दुर्लक्ष
विद्यार्थ्यांनी आधार लिंक करण्यासाठी समाजकल्याण विभागाने चार ते पाच वेळा महाविद्यालयांकडे पत्र व्यवहार केला आहे. मात्र, महाविद्यालयांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाविद्यालये याकडे कानाडोळा करीत असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शिष्यवृत्ती योजनेसाठी ३ डिसेंबरपासून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २२०० जणांनी अर्ज आॅनलाईन अर्ज केले आहे. विद्यार्थ्यांनी तातडीने आॅनलाईन अर्ज करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
१६०० विद्यार्थ्यांनी आधार लिंक केले नाही. याबाबत आम्ही वारंवार महाविद्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांना आवाहनही केले आहे. विद्यार्थ्यांनी आधार लिंक करून घ्यावे.
अमित खुवले, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त, जालना