कोरोनामुळे १४२ बालकांनी गमावले पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:12+5:302021-07-14T04:35:12+5:30
जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील १४२ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात १३६ बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला ...

कोरोनामुळे १४२ बालकांनी गमावले पालक
जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील १४२ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यात १३६ बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा बालकांचे आई-वडील कोरोनामुळे मृत झाले आहेत. संबंधितांची माहिती बाल स्वराज्य पोर्टलवर भरण्यात आली आहे. संबंधित बालकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला.
जिल्हास्तरावरील कृती दल समितीची तिसरी बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सदस्य पालीस अधीक्षक विनायक देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संदीप लहाने, सदस्य सचिव आर. बी. पारवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, बालकल्याण समितीच्या अश्विनी लखमले, गजानन इंगळे, सदस्य सचिव संगीता लोंढे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लाेंढे यांनी शासकीय निर्देशानुसार झालेल्या कामाचा आढावा घेतला.
कोरोनामुळे एक पालक गमावलेल्या १४२ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. दोन्ही पालक गमावलेल्या सहा बालकांचा शोध घेतला आहे. त्याची नोंद बाल स्वराज पोर्टलवर झाली आहे. त्यांपैकी १२९ बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत करण्यात आला आहे. १२९ पैकी बालकल्याण समितीने ६० बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाव्यतिरिक्त इतर १४५ बालकांना बालकल्याण समितीने बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आदेश दिलेले आहे. उर्वरित ८२ बालकांना लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
४१ महिलांची यादी प्राप्त
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, नॅशनल बेनिफिट स्किम व इतर शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी ४१ विधवा महिलांची यादी प्राप्त झाली असून, त्यावर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.