१३६८ उमेदवार रिंगाणात; ५८६ जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:15+5:302021-01-08T05:40:15+5:30
चार ग्रामपंचायती बिनविरोध : गोंदीमध्ये सर्वाधिक ३९ उमेदवार अंबड : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सोमवारी ...

१३६८ उमेदवार रिंगाणात; ५८६ जणांची माघार
चार ग्रामपंचायती बिनविरोध : गोंदीमध्ये सर्वाधिक ३९ उमेदवार
अंबड : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सोमवारी एकूण ५८६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तालुक्यात आता १ हजार ३६८ जण निवडणुकीच्या आखड्यात उतरले आहेत. तर ५१ जागांवर बिनविरोध उमेदवार आहेत.
चांभारवाडी, देशगव्हाण, कुकडगाव, निहालसिंगवाडी, ढालसखेडा या ग्रामपंचायतीमध्ये जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार रिंगणात आहेत. तर गोंदीत सर्वाधिक ३९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निहालसिंगवाडी येथील तीन प्रभागांतून सात सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्यातच निहालसिंगवाडी प्रत्येक प्रभागांतून केवळ सात अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. यामुळे आता केवळ औपचारिकता म्हणून बिनविरोधची घोषणा होणे बाकी आहे. या गावच्या ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. तहसील कार्यालयात सोमवारी सकाळपासून पॅनल प्रमुख, उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसील परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात २४ टेबलवर रात्री उशिरापर्यंत चिन्हांचे वाटप सुरू होते. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. अंबड तालुक्यात २३४ प्रभागांत ६२७ सदस्य निवडले जाणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडून मतदान प्रक्रियेची तयारी केली जात आहे. एकूणच आता लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने गावागावात प्रचाराला वेग आला आहे. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी करावयाच्या खर्चात काही प्रमाणात वाढही केली आहे. यापूर्वी असलेली २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे.