१,३२५ कर्मचाऱ्यांना मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:01+5:302021-01-13T05:19:01+5:30
दिलीप सारडा बदनापूर : तालुक्यातील आरोग्य विभागातील १,३२५ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या ...

१,३२५ कर्मचाऱ्यांना मिळणार लस
दिलीप सारडा
बदनापूर : तालुक्यातील आरोग्य विभागातील १,३२५ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची पूर्वतयारी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून, त्याची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे.
बदनापूर तालुक्यात लवकरच कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. बदनापूर ग्रामीण रुग्णालय, वरुडी येथील वैद्यकीय महाविद्यालय, वाकुळणी, शेलगाव, सोमठाणा, दाभाडी प्राथमिक केंद्रात हे लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रात आरोग्यसेविका, आशा, शिक्षक, पोलीस, असे एकूण पाच कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. शिवाय वाढीव पाच कर्मचारी प्रत्येक केंद्रात राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोना लसीकरणाबाबत ६० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, सहा नोडल अधिकारी व एक तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे लसीकरणावर लक्ष राहणार आहे.
तालुक्यातील रोशनगाव येथील आयुर्वेद दवाखान्यातील ३ कर्मचारी, बदनापूर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील २० कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथील ३३ कर्मचारी, वाकुळणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २०२ कर्मचारी, शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील २२७ कर्मचारी, सोमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील १६८ कर्मचारी, दाभाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५६ कर्मचारी, असे एकूण ९०९ शासकीय आरोग्य कर्मचारी तसेच वरुडी येथील जेआयआययूएसआयआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ३०५ कर्मचारी, शेलगाव येथील गुरुमिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमधील ५८ कर्मचारी, बदनापूर शहरातील खाजगी दवाखान्यांमधील ४८ व शेलगाव येथील खाजगी दवाखान्यांमधील ५, अशा एकूण १,३२५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लसीकरणाचा तिसरा टप्पा मोठा
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा मोठा राहणार आहे, तर चौथ्या टप्प्यात उच्च रक्तदाब, मधुमेह आदी विविध आजारांतील रुग्णांना लस देण्यात येणार आहे.
-डॉ. योगेश सोळुंके,
तालुका आरोग्य अधिकारी, बदनापूर