११ टक्के नागरिकांनी घेतले दोन्ही डोस; गरोदर मातांचेही लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:45+5:302021-08-28T04:33:45+5:30
विजय मुंडे जालना : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. जिल्ह्यातील केवळ ३३ टक्के नागरिकांनी ...

११ टक्के नागरिकांनी घेतले दोन्ही डोस; गरोदर मातांचेही लसीकरण सुरू
विजय मुंडे
जालना : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. जिल्ह्यातील केवळ ३३ टक्के नागरिकांनी पहिला, तर ११ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. विशेषत: या मोहिमेत आता गरोदर मातांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आजवर ६१ हजार ६९९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ११८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील यशस्वी उपचारांनंतर ६० हजार ४७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महत्त्व देण्यात आले आहे. परंतु, जालना जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. आजवर पाच लाख ६० हजार २७६ जणांना पहिला, तर एक लाख ९१ हजार २७२ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस ३३ टक्के, तर दुसरा डोस ११ टक्के नागरिकांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्करमध्ये सर्वांनी पहिला डोस घेतला आहे, तर केवळ ५२ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. सर्व फ्रंटलाईन वर्करचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. परंतु, दुसरा डोस घेण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने आजवर केवळ ४६ टक्के जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटांतील युवकांनी दुसरा डोस घेण्याकडे जणू पाठच फिरविली आहे. २ लाख ३७ हजार १४८ जणांनी पहिला, तर केवळ ४५ हजार १७५ जणांनी प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ३२ टक्के नागरिकांनी पहिला, तर १४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील २४ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
वेळेत लसीकरण करून घ्यावे..
जिल्ह्यातील गरोदर मातांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जालना येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अधीक्षक डॉ. आर. एस. पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, डॉ. सूर्यकांत सोनखेडकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील गरोदर मातांनी लसीकरण करून घ्यावे, लसीकरणानंतरही मास्कचा वापर करण्यासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.