अंबड / वडीगोंद्री : अंबड तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक व चोरीप्रकरणी विविध वाहनधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यातील ३२ वाळू माफियांनी दंड भरला नसल्याने वसुलीसाठी १ काेटी ६४ लाखांचा बोजा मालमत्तावर लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासंबंधीचे पत्र बँक व्यवस्थापन, परिवहन विभाग, नगरपालिकेस पाठवण्यात आले असल्याची माहिती माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.
मागील वर्षभरात महसूल विभागाकडूनवाळूची अवैध वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईनंतर दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यातील ३२ जणांच्या स्थावर मालमत्ता, घर, बँक खाते व वाहनावर १ कोटी ६४ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा बोजा टाकण्यासाठी पत्र देण्यात आलेले आहे. महसुली दंड न भरल्याने तहसीलदारांनी संबंधितांचा ट्रॅक्टर, हायवा व जेसीबीसह स्थावर मालमत्ता, घर, बँक खाते व वाहनांवर बोजा टाकण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महसूलचे मंडळ अधिकारी, सर्व बँकेचे बँक व्यवस्थापक यांना आदेश दिले आहेत.
यामध्ये २१ ट्रॅक्टर १२ हायवा व ३ जेसेबी या वाहनाचा समावेश आहे. बोजा टाकल्यानंतर देखील दंडाची रक्कम भरले नाही, तर ज्या प्रॉपर्टीवर बोजा चढवण्यात आलेला आहे, त्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात येत येणार आहे. तसेच विविध बँकेत असलेले खाते सुद्धा गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.