'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 08:40 IST2025-12-22T08:39:35+5:302025-12-22T08:40:06+5:30
बांगलादेशातील हिंसाचार, अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भारतासोबत बिघडलेले संबंध याला युनूस सरकारच जबाबदार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे.

'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशातील हिंसाचार, अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भारतासोबत बिघडलेले संबंध याला युनूस सरकारच जबाबदार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या ईमेल मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य
शेख हसीना यांनी भारत-बांगलादेश संबंधांबाबत चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "भारत हा बांगलादेशचा सर्वात विश्वासू मित्र आहे, मात्र युनूस प्रशासनाच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे आणि कट्टरवाद्यांना दिलेल्या मोकळ्या रानामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे." २७ वर्षीय हिंदू तरुण दीप चंद्र दास याची झालेली हत्या आणि मृतदेह जाळल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला.
निवडणुकीबाबत इशारा: 'अवामी लीग'शिवाय निवडणूक ही फसवणूक
आगामी निवडणुकांवर भाष्य करताना हसीना यांनी इशारा दिला की, अवामी लीगला डावलून होणारी निवडणूक ही मुक्त आणि न्याय्य नसून ती केवळ राज्याभिषेक असेल. "ज्या पक्षाला जनतेने नऊ वेळा जनादेश दिला, त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी आहे. अवामी लीग नसेल, तर लाखो नागरिक मतदानाकडे पाठ फिरवतील, ज्यामुळे नवीन सरकारची नैतिक वैधता संपेल," असेही त्यांनी नमूद केले.
In an email interview with ANI, former Prime Minister of Bangladesh Sheikh Hasina speaks on India–Bangladesh diplomatic strain, "The strain you are witnessing is entirely of Yunus's making. His government issues hostile statements against India, fails to protect religious… pic.twitter.com/UsEOrvEapq
— ANI (@ANI) December 22, 2025
स्वतःवरील आरोपांचे केले खंडन
आपल्याविरुद्ध न्यायालयात होणाऱ्या कारवायांना हसीना यांनी राजकीय कट असल्याचे म्हटले आहे. त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची किंवा वकील निवडण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. "माझ्या प्रत्यर्पणाची मागणी युनूस प्रशासनाच्या हताशपणातून येत आहे," असे त्या म्हणाल्या.
भारताचे मानले आभार
शेख हसीना यांनी कठीण काळात आश्रय आणि सन्मान दिल्याबद्दल भारत सरकार आणि येथील सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले. "मी देश सोडला कारण मला आणखी रक्तपात पाहायचा नव्हता, पण मी न्यायाला सामोरे जाण्यास घाबरत नाही. जेव्हा बांगलादेशात पुन्हा कायद्याचे राज्य येईल, तेव्हाच मी परत जाईन," असे त्यांनी स्पष्ट केले.