काठमांडू : नेपाळमध्येसोशल मीडियावर सरकारने घातलेल्या बंदीविरुद्ध युवाशक्ती सोमवारी रस्त्यावर उतरली. प्रचंड आक्रमक झालेल्या १२ हजारांहून अधिक युवकांनी संसदेवर हल्ला करून जाळपोळ-तोडफोड सुरू केली. यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात २० युवकांचे जीव गेले, तर ४००हून अधिक जखमी झाले. राजधानी काठमांडूसह ७ शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदीविरुद्ध १८ ते ३० वयोगटातील हजारो युवक ‘जेन-झेड’ बॅनरखाली सरकारविरुद्ध आक्रमक झाले. रस्त्यांवर निदर्शने करीत या युवकांनी थेट संसद परिसराच्या दिशेने मोर्चा वळवला. सुरक्षा दलांना न जुमानता हे युवक संसदेत घुसले व जाळपोळ-तोडफोड सुरू केली.
सोशल मीडियावरील बंदी कायम राहणार
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवण्यास स्पष्ट नकार दिला. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी सरकारचा निर्णय योग्य असल्याचे आणि सर्व मंत्र्यांनी त्याचे जाहीर समर्थन करावे असे सांगितले. यामुळे तणाव वाढला.
उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांत सुरक्षा वाढवली
नेपाळमधील तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगतच्या जिल्ह्यांत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. सीमावर्ती भागांत गुप्तचर यंत्रणांना कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ड्रोनद्वारेही देखरेख सुरू आहे. बहराइचमध्ये सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) हायवेव्यतिरिक्त गावातील रस्ते आणि जंगलमार्गांवरही गस्त वाढवली आहे.
नेपाळच्या गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा
या घटनेनंतर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची नैतिक जबाबदारी त्यांना वाटते आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या मंत्रिमंडळाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही तरुणांचा रोष थांबलेला नाही.
पहिलीच घटना
नेपाळच्या इतिहासात संसदेवर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. संसदेच्या १ आणि २ क्रमांकाच्या गेटवर युवकांनी ताबा घेतला. या युवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रारंभी अश्रुधुराचा वापर केला.
विद्यार्थीही रस्त्यावर
या आंदोलनात शाळकरी मुले-मुलीही हाती बॅनर्स घेऊन सहभागी झाले. ‘आमचे बोलणेही सरकार ठरवते गुन्हा’ अशा आशयाचे पोस्टर्स त्यांनी झळकावले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने लष्कराला पाचारण केले.
पर्यटनाला फटका
“सीमा ओलांडलेले अनेक भारतीय पर्यटक आता कर्फ्यूमुळे अडकले आहेत. त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था सरकारने करावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असे नेपाळमधील भरवन येथील रहिवासी श्रीचन गुप्ता यांनी सांगितले.