UAE Warn Iran: पश्चिम आशियातील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पेटलेल्या वणव्यात इराणने आता थेट संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य केले आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दुबई आणि अबू धाबीसह अनेक आखाती देश हादरले असून जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुर्ज अल अरब आणि विमानतळाला लक्ष्य
शनिवारी मध्यरात्री इराणने दुबईवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात दुबईची शान मानले जाणारे आणि जगातील ७-स्टार हॉटेल बुर्ज अल अरबचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, जगातील सर्वात व्यस्त असणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाच मोठे स्फोट झाले असून इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे विमानतळ तातडीने बंद करण्यात आले असून संपूर्ण आखाती क्षेत्रातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अबू धाबीतील अमेरिकन तळावर हल्ला
इराणच्या क्षेपणास्त्रांनी केवळ दुबईच नव्हे, तर अबू धाबीमधील अमेरिकेच्या अल-धफ्रा या लष्करी तळालाही लक्ष्य केले. या तळावर झालेल्या थेट हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले. याव्यतिरिक्त, पाम जुमेराह या बेटावरील एका हॉटेलजवळही भीषण आग लागल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले. फक्त यूएईच नाही, तर कतारची राजधानी दोहा आणि ओमानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.
इराणने स्वतःलाच एकाकी पाडले; यूएईचे चोख प्रत्युत्तर
या हल्ल्यानंतर यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी इराणवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांचे राजनैतिक सल्लागार अन्वर गरगाश यांनी इराणला खडे बोल सुनावले. "इराणने केलेला हा हल्ला म्हणजे त्यांची खूप मोठी चूक आहे. तुमचं युद्ध तुमच्या शेजारी देशांशी (आमच्याशी) नाही, मग आम्हाला का लक्ष्य करत आहात? इराणने आता तरी शहाणपणाने वागावं, नाहीतर संपूर्ण जग त्यांच्याकडे पाठ फिरवेल आणि ते जगात एकटे पडतील," असं अन्वर गरगाश म्हणाले.
युद्धाची पार्श्वभूमी
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी इराणने आता शेजारील देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराणने यूएईवर आरोप केला आहे की त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला मदत केली, म्हणून आता त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
Web Summary : Following attacks on Dubai and Abu Dhabi, the UAE sternly warned Iran to act wisely, or risk global isolation. Iran's actions follow alleged UAE support to US/Israel, escalating regional tensions after Khamenei's death.
Web Summary : दुबई और अबू धाबी पर हमलों के बाद, यूएई ने ईरान को कड़ी चेतावनी दी कि समझदारी से काम लें, अन्यथा वैश्विक अलगाव का जोखिम उठाएं। ईरान की कार्रवाई खामेनेई की मौत के बाद क्षेत्रीय तनाव बढ़ाती है।