'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:31 IST2025-04-24T15:18:31+5:302025-04-24T15:31:38+5:30
पाकिस्तानातील प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी त्यांच्याच देशाता पर्दाफाश केला आहे.

'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची मागणी सुरू झाली आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसावर निर्बंध आहेत, तर दूतावासातील अधिकाऱ्यांनाही परत जाण्यास सांगितले आहे. अटारी सीमेवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे म्हणणे आहे की या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. पण पाकिस्तानचे प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे.
इश्तियाक अहमद म्हणाले की, हा कसला योगायोग आहे की काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध द्वेष व्यक्त केला आणि त्यानंतर असा हल्ला झाला, यामध्ये निष्पाप लोक मारले गेले.
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
इश्तियाक अहमद म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत असे म्हणण्याची काय गरज होती. पाकिस्तानमध्येच अशांतता असताना त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर भर दिला. ते स्वतःला भारत आणि हिंदूंपेक्षा वेगळे म्हणतात, पण त्यांचा चीनशी काय संबंध आहे?, असा सवालही त्यांनी केला.
'चीन आपला काका वाटतो का?' ते नास्तिक आहे. तिथे इस्लामचा नाश होत आहे. तुम्ही तिथे गप्प आहात, पण तुम्ही पाकिस्तानला पुन्हा अडचणीत आणले आहे. आमच्यासारख्या लोकांना वाटते की व्यापारी मार्ग उघडले पाहिजेत आणि भारतापासून मध्य पूर्वेकडे व्यवसाय सुरू झाला पाहिजे, असंही प्राध्यापक म्हणाले.
पाकिस्तान चुकीच्या गोष्टी करतंय
प्रोफेसर इश्तियाक अहमद म्हणाले की, भारतासोबत चार युद्धे झाली आहेत आणि आपण काश्मीर घेऊ शकलो नाही. उलट, आपण आपल्याच देशाचे विभाजन केले. जगभरात पुन्हा एकदा बदनामी होईल. असे म्हटले जाईल की हा देश दहशतवादाला पाठिंबा देतो. पाकिस्तानमध्ये संपूर्ण सत्ता लष्करप्रमुखांकडे असते आणि ते द्विराष्ट्र सिद्धांतासारख्या गोष्टींबद्दल बोलतात. पाकिस्तान चुकीच्या गोष्टी करत आहे. आता भारतीय लोक याला प्रतिसाद देतील की सहन करतील, मला माहित नाही, असंही ते म्हणाले.
शरीफ हे लष्कराच्या मदतीने सत्तेवर आले
प्रोफेसर इश्तियाक अहमद म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेतही एक खेळ होता. शाहबाज शरीफ हे लष्कराच्या मदतीने सत्तेवर आले आहेत आणि म्हणूनच ते लष्करासमोर झुकत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
"लष्करप्रमुखांनी विधान केले आणि तिथे निष्पाप पर्यटकांना मारण्यात आले. देवाचे भयही असले पाहिजे. जगात पाकिस्तानची विश्वासार्हता आधीच शून्य आहे. आता आलेख शून्याच्या खाली जाईल, असा घरचा आहेर प्रोफेसर यांनी पाकिस्तानला दिला.