'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:56 IST2025-03-01T12:54:28+5:302025-03-01T12:56:57+5:30
ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद झाला. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप केला.

'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यात ऑन कॅमेरा झालेल्या शाब्दिक संघर्षाने जगाला हैराण केले आहे. हा वाद इतका विकोपाला पोहचला की झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून निघून जाण्यास सांगितले. ट्रम्प यांनी दोन्ही देशातील चर्चा बंद केली. दरम्यान, आता व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या जोरदार वादविवादानंतर युरोपीय नेत्यांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शविला आहे.
चीनमध्ये मोठा अपघात, जहाज आणि बोटीच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू; पाच जण बेपत्ता
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाला आक्रमक म्हटले आणि म्हटले, 'रशिया हा आक्रमक आहे आणि युक्रेन हा बळी पडलेला राष्ट्र आहे.' युक्रेन आपल्या प्रतिष्ठेसाठी, स्वातंत्र्यासाठी, आपल्या मुलांच्या आणि युरोपच्या सुरक्षेसाठी लढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी आश्वासन दिले की युक्रेन जर्मनी आणि युरोपवर अवलंबून राहू शकतो. स्पेन आणि पोलंडच्या पंतप्रधानांनीही झेलेन्स्की यांच्याशी एकता व्यक्त केली आणि म्हणाले की, "तुम्ही एकटे नाही आहात."
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी ट्विट करुन पाठिंबा दिला. ते म्हणाले की, "प्रिय राष्ट्रपती, तुम्ही कधीही एकटे नसता." "तुमची प्रतिष्ठा युक्रेनियन लोकांच्या शौर्याचा सन्मान करते. बलवान व्हा, शूर व्हा, निर्भय व्हा. न्याय्य आणि शाश्वत शांततेसाठी आम्ही तुमच्यासोबत काम करत राहू," असे त्यांनी ट्विट केले.
जॉर्जिओ मेलोनी यांनी शिखर परिषदेचे आवाहन केले
आजच्या मोठ्या आव्हानांना आपण कसे तोंड द्यायचे याबद्दल उघडपणे चर्चा करण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी यांनी अमेरिका, युरोपीय राज्ये आणि मित्र राष्ट्रांमध्ये तातडीने शिखर परिषद आयोजित करण्याचे आवाहन केले. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमधील घटना गंभीर आणि निराशाजनक असल्याचे वर्णन केले.
ट्रम्प यांनी मोठी कारवाई केली
या घटनेनंतर, अमेरिकन अधिकाऱ्यांनी युक्रेनला पुरवल्या जाणाऱ्या मदतीतील संभाव्य फसवणूक आणि गैरवापराची चौकशी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. इलॉन मस्क आणि त्यांचे 'सरकारी कार्यक्षमता विभाग' आधीच या बाबींची चौकशी करत होते, पण आता या प्रयत्नांना गती दिली जाईल.