Donald Trump on Vladimir Putin Latest news: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर दुटप्पीपणावर सडकून टीका केल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी लपवू शकले नाही. 'मी पुतीन यांच्यावर खूपच जास्त नाराज आहे. पण, आमचे संबंध संपलेले नाहीत', असे म्हणत ट्रम्प यांनी भविष्यातील योजना सांगितली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दलची स्पष्ट शब्दात भूमिका मांडली.
पुतीन यांच्यावर विश्वास आहे का? ट्रम्प म्हणाले...
अमेरिकेने युक्रेन शस्त्र देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी रशियाला १०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकीही दिली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या मुलाखतीत तुमचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर विश्वास आहे का? असा प्रश्न जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "मी कधीच कुणावर पूर्ण विश्वास ठेवत नाही."
डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांच्यावर नाराज का आहेत?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. याचबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी चार वेळा रशियासोबत तडजोड होण्याची आशा ठेवली होती, पण प्रत्येकवेळी गोष्टी जुळून आल्या नाहीत."
पुतीन यांच्यासोबत संबंध संपवले आहेत का? या प्रश्नाला ट्रम्प यांनी मात्र वेगळे उत्तर दिले. ते म्हणाले, "मी त्यांच्यावर नाराज आहे, पण संबंध पूर्णपणे तुटलेले नाहीत. मात्र हे नक्की की मी त्यांच्यावर खूपच जास्त नाराज आहे", असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.
रशियाकडून सुरू असलेला संघर्ष तुम्ही कसा थांबवणार आहात? या प्रश्नावर बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, "आम्ही यावर काम करत आहोत. आमची चर्चा खूप चांगली होते. मला असे वाटू लागते की, आम्ही कुठल्यातरी तोडग्याच्या जवळ पोहोचलो आहेत. पण, ते किव्हमधील (युक्रेनची राजधानी) कुठल्या तरी इमारतीवर हल्ला करतात."
२०२२ मध्ये रशियाने केला होता हल्ला
रशियाने युक्रेनवर २०२२ मध्ये हल्ला केला होता, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं म्हणणं आहे की, शांतता हवी आहे, पण युद्धाच्या मूळ मुद्द्यांचं निराकरण झाले पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत.