Xi Jinping Book: भारतात कम्युनिस्ट विचारधारेचा प्रसार करण्याचा चीनचा इरादा? हिंदीत प्रकाशित झालं जिनपिंग यांचं पुस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 18:49 IST2021-11-19T18:49:16+5:302021-11-19T18:49:44+5:30
Xi Jinping Book in Hindi: चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्या पुस्तकाची आता हिंदी आवृत्ती देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

Xi Jinping Book: भारतात कम्युनिस्ट विचारधारेचा प्रसार करण्याचा चीनचा इरादा? हिंदीत प्रकाशित झालं जिनपिंग यांचं पुस्तक
Xi Jinping Book in Hindi: चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्या पुस्तकाची आता हिंदी आवृत्ती देखील प्रकाशित करण्यात आली आहे. चीननं यामागचं नेमकं कारण सांगितलेलं नसलं तरी भारतात आपली कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करण्याचा चीनचा हेतू काही दडून राहिलेला नाही. हिंदीसोबतच पुस्तक मध्य आशियाई देशांमधील इतर भाषांमध्ये देखील प्रकाशित केलं आहे. पुस्तकात चीनमधील क्षी जिनपिंग यांच्या प्रशासन कारकिर्द आणि त्यांच्या सिद्धांतांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 'क्षी जिनपिंग: द गर्व्हन्सस ऑफ चायना'चा पहिला खंड हिंदी, दारी, पश्तो, सिंहली आणि उज्बेक भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आल्याची माहिती चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआनं दिली आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, शांघाई सहकारी संस्थेच्या (SCO) एका कार्यक्रमात जिनपिंग यांच्या पुस्तकाबाबत माहिती देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून जिनपिंग यांचं पुस्तक केवळ मंदारिन (चीनी भाषा) व्यतिरिक्त इंग्रजी आणि इतर काही भाषांमध्ये प्रकाशित झालं होतं. साल २०१२ मध्ये सत्तेत आल्यानंतर ६८ वर्षीय क्षी जिनपिंग हे जागतिक पातळीवर प्रबळ व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
सत्तेवर जिनपिंग यांची मजबूत पकड
क्षी जिनपिंग यांची सत्तेवरील पकड आता आणखी मजबूत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सीपीसीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अशातच पुढील वर्षापासून जिनपिंग पुन्हा एकदा म्हणजेच सलग तिसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपतीपदाचा कार्यभार हाती घेतील असं सांगितलं जात आहे.