Taliban government chess News: तुम्ही कधी विचार केला होता की, कुठला देश बुद्धिबळ या खेळावर बंदी घालेल? पण, अफगाणिस्तानात हे घडलंय. तिथल्या तालिबानी सरकारने बुद्धिबळ खेळावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याचं कारणही तालिबान सरकारने सांगितलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तालिबानमधील एका क्रीडा अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्व प्रकारच्या खेळाच्या स्पर्धांचे व्यवस्थापन करणाऱ्या तालिबान सरकारच्या क्रीडा संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.
तालिबानने बुद्धिबळावर बंदी का घातली?
अफगाणिस्तानाताली तालिबान सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे प्रवक्ते अटल मशवानी यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
मशवानी यांनी सांगितले की, 'शरिया कायदानुसार बुद्धिबळ हा जुगार समजला जातो आणि तालिबान शरिया कायद्याचे काटेकोरपणे पालन करतो.'
वाचा >>'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
'बुद्धिबळ हा जुगाराचाच एक भाग आहे, असे शरियामध्ये मानले जाते आणि मागील वर्षी जाहीर झालेल्या सद्गुण प्रचार आणि अनैतिक व्यवहार निवारण कायद्यानुसार जुगाराला बंदी घालण्यात आलेली आहे', असे अशवानी यांनी सांगितले.
बुद्धिबळावर बंदी घालण्याचे सर्वात मोठे कारण धार्मिक चिंता आहेत. जोपर्यंत धार्मिक समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यतं अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावरील बंदी कायम राहील, अशी माहिती अटल अशवानी यांनी दिली.
बुद्धिबळावर बंदी घातल्याने अफगाणिस्तानी नागरिक गोंधळात
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अजीजुल्लाह गुलजादा यांचा एक कॅफे आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कॅफेमध्ये बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. गुलजादा यांचं म्हणणं आहे की, इतर मुस्लीम देशांमध्ये बुद्धिबळ खेळला जातो. मग अफगाणिस्तानमध्ये यावर बंदी कशाला घातली जात आहे. माझ्या कॅफेमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांचा कोणत्याही जुगाराशी संबंध नाही.
एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, इतर मुस्लीम राष्ट्रांमध्ये तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेत. अलिकडच्या काळात तरुणांना खेळण्यासाठी फार खेळ राहिले नाहीत. त्यामुळे जास्त लोक बुद्धिबळ खेळायला येतात. ते चहा पितात आणि मित्रांसोबत बुद्धिबळ खेळतात.