World Bank estimates growth rate; India's GDP will remain at 6% this fiscal | जागतिक बँकेने घटविला विकास दराचा अंदाज; भारताचा जीडीपी या वित्त वर्षात ६ टक्केच राहील

जागतिक बँकेने घटविला विकास दराचा अंदाज; भारताचा जीडीपी या वित्त वर्षात ६ टक्केच राहील

वॉशिंग्टन : जागतिक बँकेने भारताच्या यंदाच्या वित्तीय वर्षातील आर्थिक विकास दराच्या अंदाजात कपात केली असून, तो अवघा ६ टक्के असल्याचे म्हटले आहे. या आधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) भारताच्या विकासदराच्या अंदाजात अशीच कपात केली होती. रिझर्व्ह बँकेनेही तसाच सूर लावला होता.
जागतिक बँकेने दक्षिण आशियातील देशांच्या आर्थिक स्थितीबाबत तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारताचा आर्थिक विकास दर २०२१ साली ६.७ टक्के व २०२२ सालापर्यंत ७.२ टक्के होण्याची शक्यता आहे.
जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची लवकरच वार्षिक बैठक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक विकास दरात सलग दुसऱ्या वर्षीही घसरण झाली आहे. 
२०१७-२०१८साली भारताचा आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता. त्यात घसरण होऊन २०१८-१९ साली तो ६.८ टक्के झाला. आता २०१९-२० या सालासाठी विकास दर ६ टक्के राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकास दरामध्ये ०.३० टक्क्यांनी कपात करून तो ७ टक्के इतका असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्या आधी रिझर्व्ह बँकेने देशाचा आर्थिक विकास दर ६.८ टक्क्यांवरून ६.१ इतका कमी केला होता. मात्र, कृषी उत्पादन व सेवाक्षेत्राचा झालेला विस्तार यामुळे औद्योगिक विकास दर ६.९ टक्के झाला आहे.


वेगवान अर्थव्यवस्था
भारताचा आर्थिक विकास दर काहीसा मंदावला असला, तरीही जागतिक स्तरावर झपाट्याने वाढणाºया अर्थव्यवस्थांमध्ये भारताला अजूनही महत्त्वाचे स्थान आहे, असे जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागासाठीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ हान्स टीमर यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: World Bank estimates growth rate; India's GDP will remain at 6% this fiscal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.