युद्ध थांबणार? रशियाने दिले शांततेसाठी संकेत; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:39 IST2025-03-06T08:39:04+5:302025-03-06T08:39:04+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले आहेत.

युद्ध थांबणार? रशियाने दिले शांततेसाठी संकेत; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये मंगळवारी दिलेल्या भाषणात म्हटले आहे. मला रशियाकडून शांततेसाठी तयार असल्याचे भक्कम संकेत मिळाले असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी युक्रेन रशियाशी पुन्हा चर्चा करत करारासाठी तयार आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी यासंदर्भात ट्र्रम्प यांना पाठविलेल्या एका पत्राचा त्यांनी या भाषणात दाखला दिला.
लहान मुलांमधील कर्करोगाचे वाढलेले प्रमाण रोखणार
ट्रम्प म्हणाले, अमेरिकेतील लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेत आठ वर्षे वयोगटातील मुलांपैकी दर ३६पैकी १ मुलगा ऑटिझम या विकाराने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. लहान मुलांना हे आजार होऊ नयेत यासाठी आम्ही आता उपाययोजना करणार आहोत. पर्यावरणातील विषारी घटक दूर करणे, अन्नपदार्थांतील विषाणूंचा नाश करणे, अमेरिकेतील मुलांना निरोगी ठेवणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटले.
‘पनामा’ वर पुन्हा दावा
पनामा कालव्यावर पुन्हा हक्क प्रस्थापित करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता. आता तो ताबा पनामा या देशाकडे आहे.
फाइट! फाइट! फाइट
ट्रम्प भाषण करत असताना त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींनी सभात्याग केला. रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी उभे राहिले व त्यांनी हात हवेत उचलत ‘फाइट! फाइट! फाइट!’ अशा घोषणा दिल्या.
भाषणाचा रेकॉर्ड तोडला
ट्रम्प यांनी केलेले पहिले भाषण सुमारे १ तास ४० मिनिटे इतक्या कालावधीचे होते. याआधी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी २००० साली १ तास २८ मिनिटे ४९ सेकंदाचे भाषण केले होते.
पाकिस्तानचे मानले आभार
२६ ऑगस्ट २०२१ रोजी काबूल येथील विमानतळावर बाॅम्बहल्ले करणाऱ्या इसिस संघटनेचा दहशतवादी मोहम्मद शरीफुल्लाह याला अटक करण्यात मदत केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले आहेत. (वृत्तसंस्था)