जागतिक तणाव आणि टॅरिफ वॉर यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची लवकरच भेट होणार आहे. या भेटीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, रशियासोबत युक्रेनमधील युद्ध थांबवण्याबाबत करार होऊ शकतो. जर असा करार झाला, तर त्याचा फायदा भारताला होईल आणि देशावरील टॅरिफ कमी होऊ शकेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ते शुक्रवारी अलास्का येथे पुतिन यांना भेटणार आहेत. ट्रम्प म्हणाले की, त्यांना तात्काळ युद्धबंदी होईल की नाही याची खात्री नाही, पण शांतता करारात मध्यस्थी करण्याची त्यांची इच्छा आहे. फॉक्स न्यूज रेडिओच्या "द ब्रायन किल्मेडे शो"ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “मला विश्वास आहे की आता त्यांना (रशियाला) करार करण्याची गरज पटली आहे.” याआधी पुतिन यांनीही युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी अमेरिका प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. या दोन्ही देशांच्या अध्यक्षांची भेट भारतासाठीही खूप महत्त्वाची आहे.
अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी दिला इशारा
अमेरिकेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेवरून दोन्ही देशांमध्ये मोठा करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा करार झाला, तर त्याचा फायदा भारताला होईल. कारण, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एक दिवस आधीच इशारा दिला होता की, जर अलास्का येथे होणारी अध्यक्ष ट्रम्प आणि पुतिन यांची भेट यशस्वी झाली नाही, तर अमेरिका भारतावर सेकंडरी टॅरिफ लावू शकते. हे टॅरिफ ५० टक्क्यांहून अधिक वाढवले जाऊ शकते.
भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा
अमेरिकेच्या सरकारने भारतावर ५०% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यापैकी २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू झाले आहे, तर उर्वरित २५% टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत बेसेंट म्हणाले, “आम्हाला आशा आहे की पुतिन गांभीर्याने चर्चेसाठी तयार होतील. मला वाटतं की, ते आता तयार आहेत. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे आम्ही भारतावर दुय्यम शुल्क लावले आहे. जर गोष्टी योग्य दिशेने गेल्या नाहीत, तर हे टॅरिफ आणखी वाढू शकते.”