बांगलादेशच्या पंतप्रधान पुन्हा एकदा शेख हसीना होणार? जवळच्या सहकाऱ्याचा मोठा दावा; भारताचे आभार मानले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:11 IST2025-03-13T16:09:40+5:302025-03-13T16:11:58+5:30
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या पीएम पदाचा राजीनामा देत शेख हसीना यांनी देश सोडला.

बांगलादेशच्या पंतप्रधान पुन्हा एकदा शेख हसीना होणार? जवळच्या सहकाऱ्याचा मोठा दावा; भारताचे आभार मानले
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. शेख यांनी देशही सोडला, यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने केला आहे.
चीनच्या सोशल मीडियात धुमाकूळ घालणारी ट्रम्प प्रशासनातील 'ही' सर्वात कमी वयाची अधिकारी कोण?
शेख हसीना यांचे जवळचे सहकारी आणि अमेरिका अवामी लीगचे उपाध्यक्ष डॉ. रब्बी आलम यांनी बुधवारी एक मोठा दावा केला. ते म्हणाले की शेख हसीना लवकरच बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. यासोबतच, शेख हसीना यांना सुरक्षित आश्रय आणि प्रवासाचा मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
डॉ. रब्बी आलम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. "शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील. तरुण पिढीने चूक केली आहे, पण ती त्यांची चूक नाही, त्यांना दिशाभूल करण्यात आले आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हस्तक्षेपाची मागणी केली. ते म्हणाले, "बांगलादेशवर हल्ला होत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजकीय बंडखोरी ठीक आहे, पण बांगलादेशात असे घडत नाही. ही एक दहशतवादी बंडखोरी आहे."
यावेळी त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांना पद सोडण्याचे आणि "ते जिथून आले होते तिथे परत जाण्याचे" आवाहन केले. "आम्ही बांगलादेशच्या सल्लागारांना सांगू इच्छितो की त्यांनी पद सोडावे आणि तुम्ही जिथून आला आहात तिथे परत जावे. डॉ. युनूस, तुम्ही बांगलादेशचे नाही आहात. हा बांगलादेशच्या लोकांना संदेश आहे की शेख हसीना परत येत आहेत, त्या पंतप्रधान म्हणून परत येत आहेत, असंही ते म्हणाले.