कोको बेटाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 11:33 IST2017-09-05T11:32:26+5:302017-09-05T11:33:40+5:30
बंगालच्या उपसागरातील कोको बेटावर चीनकडून केल्या जाणाऱ्या कथित निरीक्षणाबद्दल भारतात नेहमीच चिंता व्यक्त होत असते. एकेकाळी ब्रिटिश भारताचा भाग असणारे हे बेट आज भारतासाठीच मोठ्या काळजीचे कारण बनले आहे.

कोको बेटाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार का ?
मुंबई, दि. 5 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार दौ-यात विविध प्रश्नांवर चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बंगालच्या उपसागरातील कोको बेटावर चीनकडून केल्या जाणाऱ्या कथित निरीक्षणाबद्दल भारतात नेहमीच चिंता व्यक्त होत असते. एकेकाळी ब्रिटिश भारताचा भाग असणारे हे बेट आज भारतासाठीच मोठ्या काळजीचे कारण बनले आहे. कोको बेटाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारमधील चर्चेत उपस्थित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोको बेट हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहाच्या उत्तरेस आहे. ग्रेटर कोको, लिटल कोको, जेरी आयलंड, टेबल आयलंड, स्लीपर आयलंड, रॅट आयलंड, बिनॅकल आयलंड अशी सात बेटे या द्वीपसमुहात आहेत. या बेटांवर 750 लोकसंख्या वास्तव्यास आहे. तर बेटांचे एकूण क्षेत्रफळ 20.54 चौकिमी आहे. नारळ म्हणजेच कोकोनट यावरुन पोर्तुगिजांनी या बेटाचे नाव कोको असे ठेवले. त्यानंतर ते ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले आणि म्यानमारमध्ये विविध शहरांमध्ये व्यापार करणाऱ्या प्रसिद्ध जॅडवेट कुटुंबाला हे बेट भाडेतत्त्वावर दिले. 1937 साली ब्रिटिश भारतापासून म्यानमार वेगळा झाल्यानंतर या बेटाला क्राऊन कॉलनीचा दर्जा मिळाला. 1942 साली जपानने अंदमान निकोबारसह या बेटांवरही ताबा मिळवला होता. 1948 साली ही बेटे म्यानमारची कायमची हिस्सा बनली.
1994 साली ही बेटे म्यानमारने चीनला भाडेतत्वावर दिली असे सांगण्यात येते. तसेच चीनने या बेटांवर स्वतःचा माहिती गोळा करण्याचा तळ उभारल्याचाही आरोप करण्यात येतो. या बेटांवर विमाने उतरण्यासाठी धावपट्टी तयार केल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. मध्यंतरी कोको बेटांबद्दल लोकसभेत मीनाक्षी लेखी यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या जागी असणाऱ्या या बेटावर चीनचा वाढणारा वावर भारतासाठी नक्कीच चिंतेचा मुद्दा आहे.