पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 08:26 IST2025-09-20T08:15:58+5:302025-09-20T08:26:06+5:30
या करारांत इतर अरब राष्ट्रेही सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.

पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
इस्लामाबाद :पाकिस्तान व सौदी अरब यांच्यात झालेल्या संरक्षण करारामुळे भारतासह आखाती देशांच्या भूमिकेवर जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे. प्रामुख्याने इस्रायलने कतारवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन देश एकत्र आले असून, कोणत्याही एका देशावर भविष्यात झालेला हल्ला दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल, असे या कराराचे तत्त्व असल्याने भारताने सावध भूमिका घेतली आहे.
या करारांत इतर अरब राष्ट्रेही सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. शिवाय, अरब राष्ट्रे या करारात सहभागी होणार असतील तर त्याला आमचा विरोध नसेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. पाकिस्तान आणि सौदी अरबने बुधवारी ‘स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स’ करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भारत म्हणतो...
सौदी अरेबिया व भारतामध्ये संरक्षणविषयक उत्तम सहकार्य आहे. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. परस्परांचे हित लक्षात घेऊन हे सहकार्य आणखी बळकट होईल, असे भारताने शुक्रवारी म्हटले आहे.
सौदी अरेबिया व पाकने संरक्षणविषयक करार केला आहे. या दोन्ही देशांपैकी कोणत्याही एकावर हल्ला झाला तर ते दोन्ही देशांवर आक्रमण झाल्याचे मानले जाईल, अशी तरतूद या करारात आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.