खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येवरून भारताशी उभा दावा मांडणारे जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्यापंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कॅनडाला पहिला हिंदू पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅनडामधील हिंदू खासदार चंद्र आर्य यांनी स्वत:चं नाव कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये पुढे केलं आहे.
चंद्र आर्य यांनी गुरुवारी पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये चंद्र आर्य यांनी सांगितले की, मी कॅनडाच्या पुढील पंतप्रधानांच्या शर्यतीत उतरत आहे. मी राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी एका कुशल सरकारचं नेतृत्व करेन. सध्या कॅनडाला मोठे आणि साहसी निर्णय घेण्यास घाबरणार नाही अशा नेतृत्वाची आवश्यकता आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी आणि सर्व कॅनेडियन नाहरिकांना समान अवसर मिळावेत यासाठी कॅनडाला आज काही कठीण निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
जर मी लिबरल पार्टीचा नेता बनलो तर मी कॅनडाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले कठीण आणि साहसी निर्णय घेईन, असे चंद्र आर्य यांनी सांगितले. चंद्र आर्य यांचा जन्म कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातील द्वारलू गावात झाला होता. तसेच त्यांनी धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठामधून एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. २००६ मध्ये ते कॅनलाडा गेले होते. तिथे त्यांनी इंडो-कॅनडा ओटावा बिझनेस चेंबरचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच २०१५ मध्ये ते कॅनडाच्या निवडणुकीत नेपियन रायडिंग येथून खासदार बनले. त्यांनंतर २०१९ आणि २०२१ मध्येही ते पुन्हा विजयी होण्यात यशस्वी ठरले.