अमेरिकेतील एका ८४ वर्षीय महिलेच्या गूढ बेपत्ता होण्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण इतके गंभीर बनले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः यात लक्ष घातले असून एफबीआय संचालक काश पटेल यांच्यावर या महिलेला शोधण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या प्रकरणाचा तपास आता युद्धपातळीवर सुरू झाला असून संशयाची सुई अपहरणाकडे वळली आहे.
कोण आहेत या महिला?
बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव नॅन्सी गुथरी असून, त्या अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय अशा 'टुडे' शोच्या को-होस्ट सवाना गुथरी यांच्या मातोश्री आहेत. शनिवारी रात्री ॲरिझोना राज्यातील टक्सन शहरात असलेल्या स्वतःच्या घरातून त्या अचानक बेपत्ता झाल्या. ८४ वर्षीय नॅन्सी यांचे आरोग्य सध्या नाजूक असून त्यांना हृदयविकार आणि तीव्र शरीरदुखीचा त्रास आहे. त्यांना नियमित औषधांची गरज असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पुढाकार आणि काश पटेल यांची एन्ट्री
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांनी सवाना गुथरी यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना धीर दिला. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी एफबीआय संचालक काश पटेल यांना थेट टक्सनला जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. काश पटेल आता आपली संपूर्ण टीम आणि आधुनिक संसाधने या मोहिमेसाठी वापरणार आहेत.
अपहरणाची भीती आणि खंडणीचे पत्र
पिमा काउंटी शेरिफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नॅन्सी गुथरी यांना त्यांच्या घरातून बळजबरीने नेण्यात आल्याची दाट शक्यता आहे. स्थानिक पोलीस प्रमुखांनी माहिती दिली की, एका स्थानिक टीव्ही चॅनेलला खंडणीचे पत्र मिळाल्याची चर्चा आहे, ज्याची सध्या कसून चौकशी केली जात आहे. अटॉर्नी जनरल पॅम बॉन्डी यादेखील या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत.
लेकीची आर्त हाक
सवाना गुथरी यांनी इन्स्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करून आपल्या आईच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. "माझ्या आईला तातडीने औषधांची गरज आहे, अपहरणकर्त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा," असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या संपूर्ण अमेरिकेचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.
Web Summary : The disappearance of 84-year-old Nancy Guthrie, mother of 'Today' show co-host Savannah Guthrie, has sparked a nationwide search. Trump ordered Kash Patel to investigate possible kidnapping in Arizona. A ransom note surfaced, intensifying the urgency.
Web Summary : 'टुडे' शो की सह-मेजबान सवाना गुथरी की 84 वर्षीय माँ नैन्सी गुथरी के लापता होने से देशव्यापी खोज शुरू हो गई है। ट्रम्प ने काश पटेल को एरिज़ोना में संभावित अपहरण की जांच करने का आदेश दिया। फिरौती का पत्र मिलने से तत्परता बढ़ गई है।