US Visa: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना मुलाखतीतून सवलत मिळवण्यास कोण पात्र ठरतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:05 IST2022-02-26T14:04:59+5:302022-02-26T14:05:18+5:30
बदललेल्या धोरणानुसार F, H-1, H-2, H-3, H-4, L, M, O, P, Q किंवा शैक्षणिक J व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्ती मुलाखतीला न येता व्हिसासाठी अर्ज करू शकता.

US Visa: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना मुलाखतीतून सवलत मिळवण्यास कोण पात्र ठरतं?
प्रश्न: मुलाखत सवलत कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी कोण पात्र ठरतं?
उत्तर: बदललेल्या धोरणानुसार F, H-1, H-2, H-3, H-4, L, M, O, P, Q किंवा शैक्षणिक J व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्ती मुलाखतीला न येता व्हिसासाठी अर्ज करू शकता. मुलाखतीतून तात्पुरती दिलेली सूट ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत असेल. सचिवांनी मुदतवाढ दिल्यास तिला मुदतवाढ मिळेल.
या तात्पुरत्या सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास, अर्जदाराला याआधी अमेरिकेचा व्हिसा (कोणत्याही प्रकारचा) जारी झालेला असावा. त्या व्यक्तीला अमेरिकेचा व्हिसा कधीही नाकारण्यात आलेला नसावा आणि संभाव्य व्हिसा अपात्रतेचे कोणतेही संकेत नसावेत. अर्जदार जिथे अर्ज करणार आहेत, त्या देशाचे ते नागरिक असावेत. अर्जदाराची पात्रता तपासण्यासाठी अतिरिक्त माहिती हवी असल्यास त्याला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार व्हिसा अधिकाऱ्यांना आहे. काही अर्जदारांना अपडेटेड फिंगरप्रिंट्स जमा करावे लागू शकतात.
व्हिसाची मुदत संपल्यानंतर ४८ महिन्यांत नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या (त्याच व्हिसा प्रकारासाठी) मुलाखत सवलतीसाठी पात्र ठरतात. १४ वर्षांखालील मुलं आणि ८० वर्षांवरील व्यक्तीदेखील मुलाखतीतून सवलत देण्यासाठी अर्ज करू शकतात. शेवटच्या अमेरिकेच्या व्हिसासाठी ते पात्र ठरले असल्यास त्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल. मुलाखत सवलतीच्या धोरणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी https://in.usembassy.gov/visas/ या संकेतस्थळाला भेट द्या.
वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका:
माझ्या स्टुटंड व्हिसाची (F-1) मुदत पाच वर्षांपूर्वी संपली. आता मी वर्क व्हिसासाठी (H1-B, L, इत्यादी.) अर्ज करत आहे. मी मुलाखतीतून सवलत मिळवण्यास पात्र ठरू शकतो का?
होय. अर्जदाराची व्हिसा पात्रता तपासून पाहण्याची गरज वकिलातीमधील अधिकाऱ्यांना वाटल्यास, अतिरिक्त माहितीसाठी मुलाखतीला बोलावण्याचे अधिकार त्यांना आहेत.
माझ्या टुरिस्ट व्हिसाची (B1/B2) मुदत पाच वर्षांपूर्वी संपली. आता मला माझ्या टुरिस्ट व्हिसाचं नुतनीकरण करायचं आहे. मुलाखतीतून सूट मिळवण्यास मी पात्र आहे का?
नाही. जर तुम्ही त्याच प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करत असल्यास त्या व्हिसाची मुदत संपून ४८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटलेला नसावा.