रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील मंत्री परिषदेच्या इमारतीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. त्यानंतर मंत्री परिषदेच्या इमारतीच्या छतावरून धूर निघताना दिसला. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यात व्यस्त आहेत. या इमारतीत मंत्र्यांची घरे आणि कार्यालये दोन्ही आहेत. रशियन हल्ल्यात एका मुलासह ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण जखमी झाले आहेत. मात्र, रशिया आता नेमकं कुणाला निशाणा बनवतेय, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या आधी रशियाने युक्रेनच्या सरकारी इमारतींवर निशाणा साधला नव्हता. मात्र, आता सगळे हल्ले सरकारी ठिकाणांवर होताना दिसत आहेत.
रशियाने कीवमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे राजधानीतील सरकारी मुख्यालयासह अनेक निवासी इमारतींना आग लागली आहे. कीवच्या महापौर विटाली क्लिट्स्को म्हणाले की, शहरावर ड्रोन हल्ल्यांनी हल्ला सुरू झाला आणि नंतर क्षेपणास्त्र हल्ले झाले. रशियाने आतापर्यंत सरकारी इमारतींना लक्ष्य करणे टाळले होते. मात्र, आता असे म्हटले जात आहे की, रशिया युक्रेनवर हवाई हल्ले वाढवणार आहे.
शांतता चर्चेची आशा संपली?रविवारी, कीववर गेल्या दोन आठवड्यांतील दुसरा सर्वात मोठा हल्ला झाला. आता दोन्ही देशांमधील शांतता चर्चेच्या आशा मावळत आहेत. डार्निटस्की येथील एका निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. कीवच्या पश्चिम स्वियाटोशिंस्की जिल्ह्यातील एका नऊ मजली इमारतीलाही क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आग लागली.
महापौर विटाली मालेत्स्की म्हणाले की, युक्रेनियन क्रेमेनचुक शहरात डझनभर स्फोट झाले, ज्यामुळे काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. लष्करी प्रशासन प्रमुख ओलेक्झांडर विल्कुल म्हणाले की, रशियाने क्रिवी रिहमधील वाहतूक आणि शहरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. दक्षिण युक्रेनमधील ओडेसा येथे निवासी इमारतींचे नुकसान झाले.
पोलंडने आपले विमान केले सक्रिय!रशियाने अद्याप हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन्ही बाजूंनी जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य केल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. असे असूनही, युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, पोलंड सशस्त्र दलांचे म्हणणे आहे की, पश्चिम युक्रेनवर हवाई हल्ल्यांचा धोका आहे, म्हणून आम्ही हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आमची विमाने सक्रिय केली आहेत.