गाझाच्या नागरिकांत एवढी हिंमत कुठून आली? हमासविरोधात सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:17 IST2025-03-27T12:16:49+5:302025-03-27T12:17:01+5:30
Israel Hamas War: हमासविरोधात हे लोक सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत आहेत. युद्धबंदीमुळे जल्लोष साजरा करत पॅलेस्टाईन माघारी परतले होते.

गाझाच्या नागरिकांत एवढी हिंमत कुठून आली? हमासविरोधात सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने
हमास या दहशतवादी संघटनेमुळे गेल्या दीड वर्षापासून मरणयातना भोगत असलेल्या गाझा पट्टीतील नागरिकांनी आपली ताकद एकवटली आहे. इस्रायलने हमासला संपविण्यासाठी गाझाच्या इमारती नेस्तनाभूक केल्या आहेत, तसेच हजारो लोकांचा बळी देखील गेला आहे. हे सर्व हमासमुळे झाल्याचा रोष आता गाझापट्टीत परतलेल्या नागरिकांत उफाळू लागला आहे. यामुळे हजारो लोक हमासला गाझातून बाहेर काढण्यासाठी एकवटले आहेत.
हमासविरोधात हे लोक सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत आहेत. युद्धबंदीमुळे जल्लोष साजरा करत पॅलेस्टाईन माघारी परतले होते. परंतू, त्यांचा हा आनंद काही दिवसांपुरताच राहिला. कारण हमासने पुन्हा गाझापट्टीत ताबा घेण्यास सुरुवात केली होती. यामुळे इस्रायलने पुन्हा कारवाई सुरु केली. यात शेकडो लोक मारले गेले. हमासमुळे नागरिकांचा जीव जात असल्याने लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. अल्लाहसाठी हमास बाहेर जा, असे फलक तसेच घोषणा दिल्या जात आहेत.
उत्तरेकडील गाझा शहरातील बेत लाहिया येथून मंगळवारी या आंदोलनांना सुरुवात झाली. बुधवारी शेजैया आणि सब्रा परिसर, नुसरत निर्वासित छावणी आणि देइर अल-बलाहसह नवीन भागात या आंदोलनाची व्याप्ती पसरली आहे. आमच्या मुलांचे रक्त स्वस्त नाही, अशा आशयाचे फलक फडकविण्यात येत आहेत. तसेच इस्रायललाही युद्ध थांबविण्याची विनंती केली जात आहे.
हमासही या लोकांचे आंदोलन दडपण्यासाठी अत्याचार करत आहे. या लोकांना पकडत असून तुरुंगात टाकून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. तरी देखील मोठ्या संख्येने लोक धाडस करत आहेत. असाच आक्रोश सुरु राहिला तर इस्रायलच्या मदतीने हमासला गाझा पट्टीबाहेर हाकलण्यास जास्त वेळ लागणार नाही.