Donald Trump Kim Jong Un summit : लंचमध्ये काय काय? या पदार्थांचा होता ट्रम्प व किम जोंग यांच्या जेवणात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:25 IST2018-06-12T12:25:46+5:302018-06-12T12:25:46+5:30
सिंगापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक भेटीनंतर पश्चिमी-आशियाई पदार्थांची चव ट्रम्प आणि किम जोंग यांनी चाखली.

Donald Trump Kim Jong Un summit : लंचमध्ये काय काय? या पदार्थांचा होता ट्रम्प व किम जोंग यांच्या जेवणात सहभाग
सिंगापूर- बीफ, गोडाचे पदार्थ ते आईस्क्रीम अशा सगळ्या पदार्थांचा समावेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन यांच्या दुपारच्या जेवणात होता. सिंगापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक भेटीनंतर पश्चिमी-आशियाई पदार्थांची चव ट्रम्प आणि किम जोंग यांनी चाखली. कोरियन स्टफ्ड कुकुंबर आणि बीफचा सहभाग लंचमध्ये होता. सिंगापूरच्या सेनटोसा बेटावरील कापेला हॉटेलमधील द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही नेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र लंच केलं.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या मेनूच्या यादीत अनेक पदार्थांचा सहभाग होता. दोन्ही नेत्यांना प्रॉन्स कॉकटेल, एवॉकॅडो सॅलड, ग्रीन मँगो सॅलड डीश त्यावर मध आणि लिंबाचं ड्रेसिंग, फ्रेश ऑक्टोपस असे पदार्थ स्टार्टर्समध्ये देण्यात आले.
स्टार्टर्सनंतर मुख्य जेवणातही अनेक पदार्थ होते. बीफचा पदार्थ उकडलेला बटाटा, ब्रोकलीसह वाढण्यात आला होता. डुकराचं मांस आणि फ्राइड राइस असा मुख्य जेवणाचा थाट होता. डॅग्यू जोरीम नावाची एक कोरियन डिशही होती. मासे, मुळा आणि भाज्या एकत्रित करून हा पदार्थ तयार केला जातो. जेवणानंतर डेसर्टमध्ये ट्रम्प व किम यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाला डार्क चॉकलेट, व्हॅनिला आईस्क्रीम आणि क्रीम पेस्ट्री असे पदार्थ होते.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली. हस्तांदोलन करत या नेत्यांनी बैठकीला सुरुवात केली. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली.