"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:37 IST2025-09-23T13:53:52+5:302025-09-23T14:37:23+5:30
पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यात ३० मुले आणि महिलांचा मृत्यू झाला, यामुळे तेथील सरकारविरोधात संतापाची लाट उसळळी आहे.

"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
पाकिस्तानी लष्कराने आपल्याच देशात हवाई हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात ३० नागरिकांचा मृत्यू झाला. लष्कराने पश्तून नागरिकांवर हवाई हल्ले केले. पहाटे 2 वाजताच्या सुमारास, पाकिस्तानी हवाई दलाने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावात JF-17 लढाऊ विमानांमधून किमान आठ LS-6 बॉम्ब टाकले. या घटनेनंतर आता पाकिस्तानमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महिला आणि मुलांच्या मृत्यूंविरोधात आफ्रिदी पश्तून नेते आणि व्यक्तींनी निदर्शने करण्याची तयारी सुरू केली आहे. अधिकृत आकडा ३० असला तरी, मृतांचा आकडा जास्त असल्याचे मानले जाते. या घटनेवरुन आता लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एका गावावर आठ चिनी बॉम्ब टाकले
रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाने तिरह खोऱ्यातील मात्रे दरे गावावर हवाई हल्ला केला. JF-17 लढाऊ विमानांनी आठ चिनी लेसर-मार्गदर्शित बॉम्ब टाकले. यामुळे मोठा विनाश झाला. या स्फोटांमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. आत झोपलेले लोक मृत्युमुखी पडले, तर काही जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. सकाळी रहिवाशांना लोकांचे मृतदेह आढळले.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा, गावकऱ्यांचा राग आणि सरकार आणि सैन्यविरोधी वक्तव्ये पाहून, एक लेटर प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये बॉम्ब गावावर टाकण्यात आले नाहीत, तर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले आहे. एका माहिती देणाऱ्याकडून माहिती मिळाली की टीटीपीचे दोन कमांडर, अमन गुल आणि मसूद खान, गावात लपून बसले आहेत आणि ते बॉम्ब बनवत आहेत. यामुळे हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
माहिती न देताच हल्ला
पाकिस्तानी जनतेने लष्करावर माहिती न देता हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दहशतवादी अज्ञात असले तरी, पाकिस्तानचे स्वतःचे नागरिक मारले जात आहेत, यामुळे लष्कर आणि सरकार दोघांनाही किंमत मोजावी लागू शकते. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने एक निवेदन जारी करून हवाई हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, सरकारचे काम आपल्या लोकांचे रक्षण करणे आहे. पण, आपल्याच लोकांवर हल्ला करून, पाकिस्तानी सरकार स्वतःची परिस्थिती जगासमोर उघड करत आहे. ते जगासमोर पाकिस्तानची कमकुवतपणा दाखवत आहेत.