डोनाल्ड ट्रम्प यांची ऑरेंज लिस्ट काय आहे? पाकिस्तानसह रशियाचेही नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:52 IST2025-03-17T13:46:17+5:302025-03-17T13:52:19+5:30
अमेरिकेने पाकिस्तानला ऑरेंज लिस्टमध्ये ठेवले आहे. रशिया देखील या यादीत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची ऑरेंज लिस्ट काय आहे? पाकिस्तानसह रशियाचेही नाव
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील एकूण ४३ देशांवर प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहेत. या देशांमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि रशियासह अनेक मोठे देशांचा समावेश आहे. या देशांना तीन यादीत विभागण्यात आले आहे.
पाकमध्ये अतिरेकी हल्ला : ३ सैनिक ठार
रेड, ऑरेंज, येलो अशा तीन याद्या आहेत. यापैकी, रेड म्हणजे त्या देशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली जाईल. पाकिस्तानचे ऑरेंज यादीमध्ये नाव आहे. याशिवाय रशिया देखील या यादीत आहे. या यादीत एकूण १० देशांचा समावेश आहे, नागरिकांना आंशिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल. प्रत्यक्षात, प्रभावशाली लोक आणि व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी येणाऱ्यांना प्रवेश मिळेल. स्थलांतरित आणि पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध असतील.
या याद्यांचा अर्थ काय आहे?
या देशातील नागरिकांना प्रवेशापूर्वी वैयक्तिक मुलाखत द्यावी लागेल. पाकिस्तान आणि रशिया व्यतिरिक्त, म्यानमार, बेलारूस, हैती, लाओस, एरिट्रिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान आणि तुर्कमेनिस्तान हे देश देखील या ऑरेंज यादीत आहेत. तर १० देशांना रेड यादीत ठेवण्यात आले आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर पूर्ण बंदी असणार आहे. या देशांमध्ये भारताचे शेजारी असलेले अफगाणिस्तान आणि भूतान यांचाही समावेश आहे. रेड यादीतील इतर देशांमध्ये क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन यांचा समावेश आहे. २२ देशांसह येलो यादीचा मसुदा देखील तयार करण्यात आला आहे.
जर या देशांनी ६० दिवसामध्ये दुरुस्ती केली नाही तर त्या देशांना निर्बंधांना समोरे जावे लागणार आहे. येलो यादीतील देशांना वेळोवेळी प्रवाशांची माहिती विचारण्यात येणार आहे. पासपोर्ट जारी करण्यात कोणतीही अनियमितता नाही. जर त्यांनी या कमतरता दूर केल्या तर त्यांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश दिला जाईल अन्यथा नाही. या यादीत अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा यांचा समावेश आहे. याशिवाय कंबोडिया, कॅमेरून, चाड, काँगो, माली, लायबेरिया, वानुआतु, झिम्बाब्वे इत्यादी देशांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा प्रवास बंदी घालणार आहेत.
यापूर्वीही निर्बंध घातले होते
यापूर्वी, त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांनी ७ मुस्लिम बहुल देशांतील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. या देशांमध्ये इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशांचा समावेश होता.