"२० जानेवारीपर्यंत ओलिसांना सोडले नाही तर पश्चिम आशिया उद्ध्वस्त"; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:42 IST2025-01-09T14:41:54+5:302025-01-09T14:42:12+5:30
अमेरिकेचा हमासला इशारा; अजूनही १०० लोक ओलीस

"२० जानेवारीपर्यंत ओलिसांना सोडले नाही तर पश्चिम आशिया उद्ध्वस्त"; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन : हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांना पदग्रहण सोहळ्याच्या आत सोडले नाही तर पश्चिम आशिया उद्ध्वस्त होईल. हे हमाससाठी चांगले होणार नाही. स्पष्टपणे सांगायचे तर ते कोणासाठीही चांगले होणार नाही, असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
ओलिसांची सुटका न केल्यास काय कारवाई करणार, हे ट्रम्प यांनी मात्र स्पष्ट केले नाही. फ्लोरिडामधील मार-ए-लागो इस्टेट येथे पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. अमेरिकन ओलिसांच्या सुटकेबाबत हमाससोबतच्या चर्चेची स्थिती काय आहे, या प्रश्नाला ते उत्तर देत होते. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि मोठ्या संख्येने लोकांना ओलीस ठेवले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सुमारे १०० लोक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत ज्यात काही अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी हमासला २० जानेवारीपर्यंत सर्व ओलीस सोडण्याचा इशारा दिला.
ट्रम्प यांनी असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातच ते म्हणाले होते की, मी पदावर येईपर्यंत हमासने कारवाई केली नाही तर हमाससाठी हे योग्य होणार नाही. याची पुनरावृत्ती त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा केली आहे.
पोर्नस्टार प्रकरणात शिक्षा रद्द करा : ट्रम्प
- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉर्नस्टारला गप्प बसवण्यासाठी पैसे दिल्याच्या (हशमनी) प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्याविरुद्धच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायाधीशांनी शिक्षा स्थगित करण्यास नकार दिला होता.
- ट्रम्प यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की राष्ट्राध्यक्षांना खटल्यापासून संरक्षण आहे आणि हा निर्णय पोर्नस्टारला गप्प करण्याच्या बाबतीतही लागू होतो. हशमनी यांचे हे प्रकरण ट्रम्प यांच्या एका पॉर्नस्टारशी असलेल्या संबंधांबाबत आहे. नात्याबाबत मौन पाळण्यासाठी ट्रम्प यांनी पॉर्नस्टारला पैसे दिल्याचा आरोप आहे.