पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, भारताने न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य केल्यास, पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्यास तयार आहे.
काय म्हणाले बिलावल भुट्टो?बिलावल भुट्टो यांनी अल-जझीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'भारत हाफिज सईद (लष्कर-ए-तैयबा प्रमुख) आणि मसूद अजहर (जैश-ए-मोहम्मद प्रमुख) यांना पाकिस्तानात आश्रय दिला जात असल्याचा आरोप करत आहे. या दोघांवर भारतात अनेक गंभीर दहशतवादी हल्ल्यांचे आरोप आहेत आणि भारत त्यांचे प्रत्यार्पण मागत आहे.'
त्यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, "अशा व्यक्तींना भारताला सुपूर्द करण्यास पाकिस्तानला काही आक्षेप नाही. पण यासाठी एक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. भारताने पुरावे सादर करावेत आणि साक्षीदार पाठवावेत."
मसूद अजहरबाबत पाकिस्तानकडे माहिती नाही!भुट्टो यांनी यावेळी असेही म्हटले की,"पाकिस्तान सरकारकडे मसूद अजहर सध्या कुठे आहे, याची कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. जर भारताने ठोस आणि विश्वसनीय पुरावे दिले की, तो पाकिस्तानात आहे, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. भारताने त्याचा ठावठिकाणा सांगावा."
कोण आहेत हाफिज सईद आणि मसूद अजहर?हाफिज सईद हा २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असून, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख आहे. तर, मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख असून, २००१चा संसद हल्ला, २०१६ पठाणकोट हल्ला आणि २०१९च्या पुलवामा हल्ल्यासारख्या घटनांचा मुख्य सूत्रधार आहे.