लाखोंच्या साक्षीने पॅरिसच्या रिपब्लिक चौकात ‘आम्ही चार्ली’चा जयघोष!
By Admin | Updated: January 12, 2015 00:54 IST2015-01-12T00:54:15+5:302015-01-12T00:54:15+5:30
पॅरिस शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शोक व निर्धार रॅलीसाठी लाखो लोक रिपब्लिक चौकात जमा झाले. सुमारे दहा लाख लोक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले होते.

लाखोंच्या साक्षीने पॅरिसच्या रिपब्लिक चौकात ‘आम्ही चार्ली’चा जयघोष!
पॅरिस : पॅरिस शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शोक व निर्धार रॅलीसाठी लाखो लोक रिपब्लिक चौकात जमा झाले. सुमारे दहा लाख लोक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले होते. त्याबरोबरच निर्धार व्यक्त करण्यासाठी युरोपीय देशातील ४० नेतेही यावेळी उपस्थित होते. फ्रान्समधील तीन दिवसांचा रक्तपात, त्यात बळी गेलेल्या ज्यू व मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांसह १७ लोकांच्या सन्मानार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला. युरोपीय जनतेच्या एकीचा हा भव्य शो असून इस्रायल व पॅलेस्टिनचे नेते, या मोर्चात सहभाग नोंदवला.
निळेभोर आकाश आणि सूर्यप्रकाश अशा रम्य वातावरणात लोकांच्या भावनांचा मिलाफ झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोक या मोर्चात सहभागी असून सर्वांचेच डोळे ओलावले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुक्तता, आम्ही सर्व चार्ली असे लिहिलेले फलक लोकांच्या हातात होते.
लसिना ट्राओर या ३४ वर्षांच्या फ्रेंच मुस्लिम महिलेने डे ला रिपब्लिक येथील स्मारकावर १७ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. याच ठिकाणी चार्ली हेब्डो साप्ताहिकावरील हल्ल्यात मरण पावलेल्या १७ लोकांचा सन्मान म्हणून ठेवलेल्या फुलांच्या राशी आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे आम्ही घाबरलो नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मला बचाव करायचा आहे, असे ७० वर्षांच्या जॅकेलिन साद रुआनाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)