पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:34 IST2025-07-26T09:31:52+5:302025-07-26T09:34:54+5:30
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले, यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
पहलगाम हल्ल्या झाल्यानंतर लगेच काही वेळानंतर 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या संघटनेला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटनेच्या (FTO) यादीत टाकले होते. तेव्हापासून पाकिस्तान अस्वस्थ आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF ला पाठिंबा दिल्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी TRF बद्दलही चर्चा केली.
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
इशाक दार यांच्या मते, टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा अमेरिकेचा स्वतःचा निर्णय आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. जर अमेरिकेकडे टीआरएफ दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे असतील तर ते तसे करू शकतात.
"टीआरएफला लष्कर-ए-तोयबाशी जोडणे चुकीचे आहे. पाकिस्तानने अनेक वर्षांपूर्वी लष्करचा नाश केला होता. लष्करशी संबंधित दहशतवाद्यांवर खटले चालवण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आले", असंही इशाक दार यांनी सांगितले.
संसदेत केले होते हे विधान
'संयुक्त राष्ट्रांमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधादरम्यान आम्ही टीआरएफचे नाव घेण्यास आक्षेप घेतला होता. मला जगभरातून फोन आले, परंतु आम्ही यावर सहमत झालो नाही', असं इशाक दार यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हटले होते.
अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली
भारताने जानेवारी २०२३ मध्येच बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत TRF ला दहशतवादी संघटना घोषित केले. TRF २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. तेव्हापासून TRF ने जम्मू आणि काश्मीरमधील अनेक मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.