नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:51 IST2025-07-29T12:51:25+5:302025-07-29T12:51:43+5:30
१६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती.

नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
यमनच्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर १६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर, मंगळवारी काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला की, यमनमध्ये निमिषाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. पण, या संदर्भात भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
निमिषाची शिक्षा रद्द झाल्याच्या वृत्तांमुळे अद्यापही गोंधळ कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यमनच्या अधिकाऱ्यांनी निमिषाची शिक्षा रद्द केलेली नाही. जे दावे केले जात आहेत, ते सर्व खोटे आहेत. भारत आणि यमन सरकारच्या वतीने या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यामुळे, निमिषा प्रिया प्रकरणात पुढे काय होणार, हे स्पष्ट नाही.
शिक्षा रद्द झाल्याचा दावा कोणी केला?
भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी निमिषाची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी यमनमधील धर्मगुरूंशी चर्चा केली, त्यानंतर मृत्यूची शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली होती. याच ग्रँड मुफ्तींच्या कार्यालयाने दावा केला होता की, यमनने निमिषाची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. यासंदर्भात सना येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती, त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.
सरकारकडून अद्याप कोणतेही विधान नाही!
या प्रकरणी भारत सरकारही दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. मात्र, शिक्षा रद्द झाल्याच्या दाव्यांवर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे, निमिषाची फाशीची शिक्षा अद्याप रद्द झालेली नाही, हे स्पष्ट आहे. आता सरकार या अफवांवर कधी आपले निवेदन जारी करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
प्रकरण नेमकं काय आहे?
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेली निमिषा प्रिया २००८ मध्ये एक नर्स म्हणून यमनला गेली होती. तिथे पोहोचल्यावर निमिषाने अनेक रुग्णालयांमध्ये काम केले. २०१५ मध्ये निमिषाने यमनमध्ये राहणाऱ्या तलाल अब्दो महदी यांच्यासोबत एक मेडिकल क्लिनिक सुरू केले. दोन वर्षांपर्यंत दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते. त्यानंतर मात्र त्यांच्या संबंधांमध्ये बिघाड सुरू झाला.
२०१७मध्ये निमिषाचा पार्टनर महदीचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत सापडला होता. निमिषाने त्याला झोपेच्या औषधांचा जास्त डोस दिल्याचा आरोप आहे. हत्येनंतर एका महिन्याने निमिषा प्रियाला यमन-सौदी अरब सीमेवरून अटक करण्यात आली. २०२० मध्ये सना येथील न्यायालयाने निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. २०२३मध्ये यमनच्या सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. सध्या निमिषा प्रिया सना तुरुंगात बंद आहे.